आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपबीती:'मेरे बचने की खुशी नही, भाई के जाने अफसोस जिंदगीभर रहेगा';पुरातून बचावलेल्या सय्यद सलीमने सांगितली आपबीती

विठ्ठल देशमुख | पिंपळगाव रेणुकाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
इनसेटमध्ये पुरात वाहून गेलेला तरुण  शाहेद सईद सय्यद - Divya Marathi
इनसेटमध्ये पुरात वाहून गेलेला तरुण शाहेद सईद सय्यद
  • मी उडी मारुन बांबू पकडला, पण याच वेळी घात झाला आणि शाहेदचा हात माझ्या हातातून निसटला....

भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथे नदीला आलेल्या पुरातून वाट काढण्याचे धाडस करणारे दोन युवक बुधवारी वाहून गेले होते. यातील सय्यद सलीम या युवकाला ग्रामस्थांनी प्रयत्न करुन वाचवले, मात्र शाहेद सईद हा वाहून गेला. यात वाचलेल्या सय्यद सलीम याने जिवावर बेतलेले धाडस केल्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले. 'मेरे बचने की खुशी नही, मेरे भाई के जाने का अफसोस जिंदगीभर रहेगा', असे या युवकाने सांगितले. त्याची ही आपबीती त्याच्याच शब्दात…

वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू
वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू

'मी आणि माझा लहान चुलत भाऊ शाहेद सईद सय्यद (19) धाड येथून काम आटोपून घराकडे येत होतो. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आम्ही गावाजवळ आलो तेव्हा या नदीला पूर आलेला होता. पुलावरुन पाणी सुरु असल्याने दोन्ही बाजुने वाहतूक थांबवलेली होती. कुणीही पुढे जाण्याचे धाडस करीत नव्हते. पाणी कमी असल्याने आपण या पाण्यातुन सहज निघू शकतो या हिमतीवर मी शाहेदचा हात धरुन पूल पार करु लागलो. यावेळी दोन्ही बाजुने थांबलेल्या ग्रामस्थांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊ नका, मागे या असे अनेकजण सांगत होते. लोक मोठ-मोठ्याने ओरडत होते. आम्ही मात्र कुणाचेच ऐकले नाही. आम्ही पुढे जातच होतो. पुलाच्या अर्ध्या मध्ये आलो तेव्हा पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. तेवढ्यात मी खाली पडलो. आता आपले काही खरे नाही असे वाटले.'

वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू
वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू

'आम्ही पुलावरुन खाली नदीच्या पात्रात पडलो. पाण्याचा प्रवाह वाढलेला होता. नाका-तोंडात पाणी गेले. आम्ही गटांगळ्या खात होतो. अशातच नदीच्या दोन्ही बाजुने ग्रामस्थ धावत आले. त्यांनी बांबू टाकून आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केला. मी उडी मारुन बांबू पकडला खरा मात्र याच वेळी घात झाला. शाहेदचा हात माझ्या हातातून निसटला. एका हाताने बांबू पकडलेला तर दुसऱ्या हाताने मी शाहेदला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मी पकडू शकलो नाही. माझ्या डोळ्यासमोर शाहेद वाहून गेला. मी नदीच्या बाहेर आल्यावर पुन्हा धावायला लागलो मात्र ग्रामस्थांनी मला रोखून ठेवले. मृत्यू काय असतो हे याची देही याची डोळा अगदी जवळून पाहिले. आम्हाला आमचा अति आत्मविश्वास नडला. मी या घटनेतून वाचलो असलो याचा मला जराही आनंद नाही. माझ्या भावाला मी वाचवु शकलो नाही, याचे मोठे दुःख मला वाटत आहे. हा पश्चाताप मला आयुष्यभर असणार आहे. वीज,आग आणि पाणी यांच्यासोबत खेळण्याचे साहस कुणीच करु नये असे मी मोठ्यांच्या तोंडून अनेकवेळा ऐकले होते. मात्र त्याचे परिणाम काय असतात हे आज अनुभवले. मी ठेच लागल्यानंतर शहाणा झालो अशी वेळ इतरांवर येऊ नये.'

बातम्या आणखी आहेत...