आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१७ लाख औरंगाबादकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या २७०० कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेचा आढावा शनिवारी (३ डिसेंबर) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतला. जेव्हीपीआर या ठेकेदार कंपनीने १५ दिवसांपूर्वी जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम सुरू करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात काम सुरू केलेच नाही. हे कळताच डॉ. कराड संतापले. ठेकेदाराला कशाची मस्ती आलीय मला माहीत नाही, असे ते म्हणाले. अशाच पद्धतीने तर फेब्रुवारी २०२४मध्ये योजना पूर्ण होणार नाही. पैसा उपलब्ध असूनही ही योजना आणखी संकटात सापडू शकते. त्यामुळे यापुढे मीच दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी योजनेचा आढावा घेणार आहे, कामाला गती देणार, असे ते म्हणाले.
१२० मीटरचे टार्गेट प्रत्यक्षात ६० मीटर काम डॉ. कराड म्हणाले की, ठेकेदाराला दररोज १२० मीटर पाइप अंथरायचे टार्गेट देण्यात आले. ते त्याने मान्यही केले. प्रत्यक्षात फक्त ६० मीटरच पाइप टाकले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेवर केंद्र आणि राज्य सरकारचेही लक्ष आहे. पैसा कुठेही कमी पडणार नाही, याची ठेकेदार कंपनीला पूर्ण माहिती आहे, असे डॉ. कराड म्हणाले. अशी स्थिती असतानाही ठेकेदार एवढा बेफिकीर का, त्याच्या मागे कोणती शक्ती आहे का, या प्रश्नावर डॉ. कराड म्हणाले की, शक्तीचीही माहिती नाही.
यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी दिला होता दम महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ठेकेदाराला दम दिला होता. तेव्हा त्याने लोखंड, सिमेंटचे भाव वाढल्याने एवढ्या कमी दरात काम परवडत नाही, असे उत्तर दिले. त्यावर मुंबईत विशेष बैठक आयोजित करून ठेकेदाराला वाढीव ४०० कोटी रुपये देण्याची तयारी सरकारने केली होती.
बिनकामाची दोन वर्षे वाया गेल्याने खर्च वाढला ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. मजीप्राला जाब विचारण्याचे काम मनपाने करणे अपेक्षित आहे. मजीप्राचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी योजनेचा लेखाजोखा मांडताच डॉ. कराड म्हणाले की, बिनकामाची दोन वर्षे वाया गेल्याने खर्च वाढला. ही रक्कम खरे तर ठेकेदाराकडूनच वसूल झाली पाहिजे. ठेकेदार प्रतिनिधी निर्णय अग्रवाल यांनी बिल मिळत नसल्याचा दावा केला. तो लोलापोड यांनी खोडून काढला.
ठेकेदाराला नोटीस, दंड ठोठावण्याचा इशारा वेळेत बिल मिळत नाही, या दाव्यावर मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरीही चिडले होते. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे काम कोणतीही सबब न सांगता आठ दिवसात सुरू करा, असे डॉ. कराड यांनी बजावले. आतापर्यंत फक्त साडेपाच किलोमीटर पाइप टाकले आहेत. कामाची गती वाढवली नाही तर दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा देणारी नोटीस यापूर्वीच बजावण्यात आली आहे, अशी माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.
विद्यापीठ औरंगाबादला आणू : गिरीश महाजन ‘क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला मिळाले पाहिजे. तरच मराठवाड्यातील खेळाडूंना त्याचा लाभ होईल. त्यासाठी प्रयत्न करू. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. याबाबत चर्चाही झाली. औरंगाबादला पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न करू.’
पळवलेले क्रीडा विद्यापीठ परत द्या : भागवत कराड २०१९ दरम्यान आलेल्या महाविकास आघाडी सरकारने क्रीडा विद्यापीठ पळवून नेले. आता गिरीशजी, तुम्ही देवेंद्रजींच्या जवळ आहात. क्रीडा व युवक कल्याण मंत्रीही आहात. तुम्ही आमचे क्रीडा विद्यापीठ परत मिळवून द्या.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.