आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू:नवरा आता माझा नाही म्हणून आत्महत्या करते; पर्समध्ये आढळली नोट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारची महिला, तिचा पती, मुलगा सतत त्रास द्यायचे. त्यांना जाब विचारणे सोडून पती शेजारणीची बाजू घेऊन आपल्या बायकोलाच त्रास द्यायचा. या सर्वांच्या जाचाला कंटाळून ३४ वर्षीय सविता दीपक काळे या महिलेने गुरुवारी थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन पेटवून घेतले. आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. काल पोलिसांनी तातडीने महिलेला घाटीत दाखल केले होते. ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती.

‘माझा नवरा माझी बाजू घेत नाही. तो शेजारच्यांची बाजू घेत हाेता. पोलिस कर्मचाऱ्याची धमकी देऊन तो माझ्यावर दबाव आणत होता. त्यामुळे मी कंटाळले आहे. पोलिसांनी समजूत घालूनही माझा नवरा सुधारला नाही. त्यामुळे मला जगायचाच कंटाळा आलाय. त्यामुळे मी स्वत:ला पेटवून आत्महत्या करते, आता तरी त्या तिघांवर कारवाई करा,’ असा मजकूर टाइप केलेली तक्रार पोलिसांना सविताच्या पर्समध्ये आढळली, मात्र ती पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही अशी माहितीही समोर आली आहे.

गंभीर भाजलेल्या सविताचा भाऊ श्यामसुंदर काकडे यांनीही या प्रकाराला तिचा पती व पोलिसांना जबाबदार धरले. ‘दिव्य मराठी’शी बोलताना काकडे म्हणाले, ‘हवालदार गायकेच्या जिवावर संगीता धमकावत होती. पोलिस ठाणे विकत घेईल, इथपर्यंत संगीता बोलायची. गावातील अनेक महिलांना त्यांचा त्रास आहे. मात्र तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मी वाळूजचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांना विनंती केली तर तुम्ही मला कायदा शिकवणार का, असे ते म्हणाले. आम्हालाच मारहाण करून आमच्याविरोधात तक्रारी केल्या.

नेहमीच्या जाचाला कंटाळून मुलांना घरीच ठेवून सविता गेली होती भावाच्या आश्रयास
दीपक सविताचा वारंवार छळ करायचा. त्याच्या या कारनाम्याची दीपकच्या कुटुंबीयांनादेखील कल्पना होती. परंतु त्यांनी मागील काही दिवसांपासून या दोघांकडे दुर्लक्ष केले होते. सविता यांना १७ व १५ वर्षांच्या दोन मुली व ११ वर्षांचा एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी पतीच्या मारहाणीला कंटाळून ती भावाकडे गेली होती. पण तिन्ही मुले मांडवा गावातच हाेती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर भाजलेल्या सविताचा जवाब नोंदवला. त्यातही तिने संगीता शेळके, त्यांचा मुलगा, पतीकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पुनरुच्चार केला आहे.

सविता मृत्यूशी झुंज देण्यापर्यंत गंभीर झाल्यानंतर संशयितांना ठाण्यात बोलावले
गंभीर भाजलेल्या सवितावर घाटीत उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांच्या माहितीनुसार, सविता ७० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने मात्र वाळूज पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सविता यांनी पेटवून घेतल्यानंतर दुपारी आरोपी संगीता व इतरांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. अदखलपात्र गुन्ह्यातील प्रतिबंधात्मक कारवाईत केलेला बाँड रद्द करण्यात येत असल्याची नोटीस आरोपींना बजावण्यात आली. परंतु यापूर्वीच कठोर कारवाई का केली नाही, असा प्रश्न सविताच्या नातेवाइकांनी केला आहे.

पाच एफआयआर तरी अटक का नाही?
सविता व त्यांच्या भावाने संगीता व इतरांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या. त्यानुसार २७ मे, ३ जून, २४ ऑगस्ट, ३० ऑगस्ट रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. पण प्रत्येक गुन्ह्यानंतर आरोपी सविताला धमकावून मारहाण करत होते. त्यामुळे सविता खचली होती. भेटायला आलेल्या तिच्या भावालाही मारहाण झाली. परंतु वाळूज पोलिसांनी केवळ कागदी प्रक्रिया पार पाडल्या. दरम्यान, या प्रकरणातील सर्व गुन्हे हे जामीनपात्र असल्याने आरोपींना अटक करता येत नाही, असा बचाव आता वाळूजचे पोलिस अधिकारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...