आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई येथील राजभवनच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित केला हाेता. या उद्घाटन सोहळ्यात हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी २२ विद्यापीठातील २,२२० विद्यार्थी, खेळाडूंशी संवाद साधला. तो त्यांच्याच शब्दांत...
नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, आज खूप वर्षांनी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी खेळाडूंना मी एकत्र भेटतो आहे. तुम्हाला पाहून मला माझेही विद्यार्थी जीवन आठवले. आयुष्यात खेळाडू होण्याचे निश्चित केले होते. असाच तुमच्यासारखा मी ग्राउंडवर बसून असायचो. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषणे ऐकायचो. त्या वेळी माझ्या मनात सतत विचार घोळत होते की, मी कधी नाव कमवेन का..? मी देशासाठी खेळून नाव रोशन करेन का..? हे स्वप्न उराशी बाळगून मी खेळायला सुरुवात केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही. ८ तास मैदानावर हॉकीचा सराव करत होतो.
हॉकीला मी पॅशन बनवले. त्यामुळे मी सतत १६ वर्षे देशासाठी हॉकी खेळू शकलो. आमच्या वेळी कॅश प्राइझ खूप कमी मिळायचे. आता तर तुम्हाला लाखो, करोडो रुपयांचे कॅश प्राइझ मिळू शकतात. त्यातून तुम्ही तुमच्या जीवनाला आकार देऊ शकता. आता मला पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले आहेत. मी जरी मूळ तामिळनाडूचा असलो तरी महाराष्ट्राने माझ्यावर खूप प्रेम केले. माझा जन्म पुण्यातील खडकी येथे झाला. मुंबईत मला राज्य सरकारने घर दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासाठी जे केले ते मी कधीही विसरणार नाही. तामिळनाडू सरकारनेही मला चेन्नईत घर दिले आहे. तुम्ही खेळत राहा, त्यात सातत्य ठेवा. तुम्हाला सन्मान मिळत राहतील. शाळा, कॉलेज, विद्यापीठाकडून खेळा. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आई-वडिलांना कधीही विसरू नका. त्यांच्यासह देशाचे नाव करा. पुण्याचे डॉ. दीपक माने सरांचे मी आभार मानतो. त्यांनी पुण्यात करोडो रुपये खर्चून सिंथेटिक ट्रॅक तयार केला आहे. त्यामुळे पुण्यातील खेळाडूंचे बाहेर प्रॅक्टिसला जाणे थांबले. आता ते पुण्यातच प्रॅक्टिस करतात. पॅशन, डेडिकेशन व हार्ड वर्क केले तर तुम्हीही नक्की यशस्वी व्हाल. धन्यवाद...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.