आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाची भावनिक साद:‘आई अन‌् पप्पांसोबत मला राहायचंय... साहेब, तुम्हीच तसे लिहा’

औरंगाबाद / सतीश वैराळकर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक कारणावरून पती- पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. दोघेही एकमेकांना समजून घेण्याच्या तयारीत नव्हते. नातेवाइकांसह अनेकांनी समजावून सांगितले. मात्र चार वर्षे भांडत भांडत संसार केल्यानंतर या दोघांनी कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र यात पाचवर्षीय मुलाची होरपळ होऊ लागली. मुलगा लहान असल्याने त्याचा ताबा आईकडेच हाेता, पण तो बापाच्या मायेला पारखा झाला. तिकडे वडीलही मुलाच्या प्रेमासाठी आसुसलेले होते. अखेर मुलाचा ताबा कुणाकडे, हा वाद बालकल्याण मंडळात पोहोचला. तिथे आई-वडील दोघेही दाव्यावर ठाम होते. पण मुलाने दोघांसोबतही राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मंडळाचे सदस्यही भावुक झाले होते.

औरंगाबादची महिला व नाशिकच्या व्यक्तीचे लग्न झाले होते. मात्र काही दिवसांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. सहा महिन्यांतच ते विकोपाला गेले. दरम्यानच्या काळात या दांपत्याला एक मुलगा झाला. पण अपत्यप्राप्तीनंतरही वाद कमी झाले नाहीत. अखेर सोबत न राहण्याचा निर्णय घेऊन दोघेही वर्षभरापूर्वी विभक्त झाले. तेव्हा त्यांचा मुलगा चार वर्षांचा होता. त्यामुळे त्याचा ताबा कायद्यानुसार आईकडे देण्यात आला. मुलगा आईसोबत औरंगाबादेत राहू लागला. आज त्याचे वय ५ वर्षे ३ महिने आहे. एक दिवस वडिलांना मुलाची खूप आठवण येऊ लागली. ते सरळ औरंगाबादला आले व मुलाच्या शाळेत गेले. खूप दिवसांनी पप्पा भेटल्याने आनंदित झालेल्या मुलानेही त्यांना मिठी मारली. ‘आता मी तुमच्याकडेच राहणार’ असा हट्ट करू लागला. वडिलांनी त्याला परस्पर आपल्यासोबत नाशिकला नेले. मात्र पत्नीला त्याचा प्रचंड राग आला. तिने थेट पोलिस ठाणे गाठून माझ्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर मुलाचा ताबा कुणाकडे असावा, यासाठी प्रकरण औरंगाबादच्या बालकल्याण मंडळाकडे गेले.

मुलगा सज्ञान नसल्याने कायद्यानुसार तूर्त ताबा आईकडेच राहणार
मुलगा आधी आईकडे जायला तयार नव्हता. पण नंतर बालकल्याण मंडळाच्या सदस्यांनी विचारणा केल्यावर एक दिवस आईकडे आणि एक दिवस पप्पांकडे राहण्यास तो तयार झाला. मुलाचे बोलणे ऐकून आई रडायलाच लागली. वातावरण भावुक झाले. मुलगाही भावनिक होऊन म्हणाला, ‘ठीक आहे, आईकडे पाच दिवस राहतो.’ मंडळ सदस्यांनी यासंबंधीचे आदेश कागदावर आदेश लिहायला सुरुवात केली. त्या वेळी मुलगा सदस्यांकडे गेला व म्हणाला, ‘मला आई आणि वडील दोघांसोबत राहायचे आहे, साहेब तुम्हीच तसे कागदावर लिहून द्या,’ त्याचे हे वाक्य ऐकून सदस्यही अवाक‌् झाले. मात्र तूर्तास मंडळाने सज्ञान नसलेल्या मुलाचा ताबा आईकडे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...