आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:पीक विम्यात राज्याच्या हिश्श्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार :  डॉ. भागवत कराड

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र अद्याप या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. या याेजनेत राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी ४९ टक्के व शेतकऱ्यांनी २ टक्के हप्ता भरणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत राज्य सरकारने आपला वाटा भरलेला नाही. त्यामुळे केंद्रालाही आपला हिस्सा नेमका किती आहे हे समजू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर आपण ८ ऑक्टाेबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांना राज्याचा वाटा लवकर भरण्याचे साकडे घालणार आहाेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी दिली.

डाॅ. कराड यांनी गुरुवारी दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद कार्यालयास सदिच्छा भेट देऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. राज्य व केंद्र सरकारने एकत्रित काम केल्यास राज्यातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागू शकतील, त्यासाठीच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी त्याचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करुन दिल्यास आपण हा प्रश्नही मार्गी लावू. तसेच या विमानळावर दोन ते तीन महिन्यात इमिग्रेशन सेंटर सुरू होत असून यामुळे येथील शेतकऱ्यांना आपला निर्यातक्षम माल हवाई वाहतुकीद्वारे थेट परदेशात पाठविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. औरंगाबादेत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरसाठी ऑरिक सिटीत ५० एकर जागा उपलब्ध आहे. नीती आयोगाचे अमिताभ कांत आणि ऑरिक सिटीचे सीईआे पी. अनबलगम यांच्याशी भेटून आपण जागेसंबंधी निवेदन दिले आहे. येथे सेंटर सुरू झाले तर उद्याेग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, चर्चासत्रे घेता येतील. या दाेन्ही कामांबाबतही राज्य सरकारची मदत मिळावी यासाठी आपण ठाकरेंशी चर्चा करणार आहाेत, असे डाॅ. कराड म्हणाले.

आयआयटीचे उपकेंद्र औरंगाबादेत करणार
स्कूल ऑफ प्लॅनिंग व आर्किटेक्चर संस्था औरंगाबादेत उभारण्याची घाेषणा फडणवीस सरकारने केली हाेती. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाेबतच आयआयटी पवईचे उपकेंद्र व आयुष रिसर्च सेंटर औरंगाबादेत उभारण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे डाॅ. कराड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...