आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपणच जबाबदार:१०० टक्के लोकांनी मास्क वापरला, ८० टक्के लोकांनी लस घेतली तर ३० दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युद्धपातळीवर लसीकरण, मास्कच्या कठोर सक्तीनेच १५ लाख औरंगाबादकर होतील सुरक्षित
  • सुमारे दहा हजार कोरोना रुग्णांवर उपचार केलेल्या डॉक्टरांना ‘दिव्य मराठी’चा सवाल : हे संकट कसे संपेल?

शहरात कोरोनामुळे दररोज १५ पेक्षा अधिक जण जीव गमावत आहेत. दीड हजारापेक्षा अधिक बाधित सापडत आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील वाढीव खाटाही कमी पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर झाला. एकीकडे कोरोनाने मृत्यू तर दुसरीकडे उपासमारीने मृत्यूची वेळ ओढवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात दहा हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आठ प्रख्यात डॉक्टरांशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला आणि कडक लॉकडाऊनशिवाय अन्य कोणत्या उपायांनी कोरोनाचे हे संकट संपेल आणि फैलाव रोखता येईल, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी एका सुरात सांगितले की, हा लढा आता लोकांनाच लढावा लागेल. १०० टक्के लोकांनी मास्क वापरला, ८० टक्के लोकांनी लस घेतली तर ३० दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल.

...तरच फैलाव थोपवता येईल
लोकांनी स्वत: स्वत:ची काळजी घेतली तरच कोरोनाचा फैलाव थोपवता येईल. आता लाॅकडाऊनचा फारसा परिणाम होणार नाही. कारण, कोरोना आता आपल्या वातावरणाचा भाग झाला आहे. आपण मास्क वापरून, लस घेऊन त्याला थोपवू शकतो. जेव्हा लोक लढा हाती घेतात तेव्हा प्रत्येक संकट परतून लावता येते. -डॉ. आनंद निकाळजे, एमजीएम रुग्णालय

ही वेळ संयमाने वागण्याची
ही वेळ सर्वांनी संयमाने वागण्याची आहे. त्यात प्रसारमाध्यमांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कोणत्या रुग्णावर किती दिवस उपचार याचा निर्णय आम्हा डॉक्टरांवर सोडायला हवा. ही लढाई फक्त डॉक्टर किंवा प्रशासनाची नाही, तर सर्वांची आहे. मास्क, लसीकरण आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करा. -डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. हेडगेवार रुग्णालय

तरुणाई जागरूक झाली तर फायदा
तरुणाई जितकी जागरूक राहील तितका फायदा अधिक होईल. मास्कच सर्वांना वाचवणार आहे. तरुणाईने मास्क लावून सर्वांची आणि स्वत:ची सुरक्षितता पाहावी. लसीकरणही प्रत्येकाने केले पाहिजे. लॉकडाऊन केल्यास रुग्णसंख्या थोडे दिवस कमी करणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णालयात खाटांचा जो प्रश्न निर्माण झाला तो सुटू शकेल. -डॉ. वरुण गवळी, धूत रुग्णालय

लोकांनी स्वत:चा लॉकडाऊन करावा
प्रशासनाने सक्तीचा लॉकडाऊन करण्यापेक्षा नागरिकांनी स्वत:चा लॉकडाऊन करणे आता गरजेचे आहे. मास्क हा प्रत्येकाने जीवनाचा भाग बनवून घेतला तर रुग्णसंख्येचा स्फोट होणार नाही. दुसरीकडे युद्धपातळीवर, कर्तव्य समजून लसीकरण केले तर कोरोनाने गंभीर होण्याचे प्रमाण आटोक्यात येईल. -डॉ. प्रदीप बेंजरगे, कृष्णा रुग्णालय

लसीकरण, मास्क आवश्यकच
तरुणाई मोठ्या प्रमाणात मास्कविना बिनधास्त फिरते. त्यांना कोरोनाने फारसे काही होत नाही. पण, त्यांच्यामुळे ज्येष्ठ नागरिक बाधित होतात. जीवही गमावतात. तरुणाईला लसीकरण सुरू झालेले नाही. त्यामुळे तरुणाईने कटाक्षाने मास्क वापरावा. युद्धपातळीवर लसीकरण करावे. यातून खूप फायदा होईल याविषयी कोणतीही शंका नाही. -डाॅ. अजय रोटे, युनायटेड सिग्मा रुग्णालय

लसीकरणाने सुरक्षित व्हाल
लसीकरणानंतर पॉझिटीव्ह झाल्याची काही प्रकरणे समोर आल्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. पण, हे लक्षात घ्या, की लसीकरणाने ८० टक्के सुरक्षितता मिळते. बाधिताला रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे मास्क वापरा. आपले जीवन सुरक्षित ठेवणे आपलीच जबाबदारी आहे. -डॉ. मंगला बोरकर, एमडी मेडीसीन, घाटी रुग्णालय

लोकांनीही लढ्यात उतरावे
आपल्या समाजाची एकूण स्थिती लक्षात घेता संपूर्ण लॉकडाऊन अशक्य आहे. आजवर शासन, प्रशासन आणि वैद्यकीय टीम कोरोनाशी लढा देत होती. आता सर्वसामान्यांनी यात उतरले पाहिजे. स्वत:हून लॉकडाऊन घ्या. अनावश्यक घराबाहेर पडू नका. गर्दी करू नका. मास्क वापरा. यातूनच कोरोनावर नियंत्रण शक्य आहे. -डॉ. उज्ज्वला झंवर, एमडी मेडिसिन, झंवर रुग्णालय

शॉर्ट लॉकडाऊनने संपणार नाही
सध्याची रुग्णसंख्या बघता शॉर्ट लॉकडाऊन करायला हरकत नाही. मात्र, यामुळे कोरोना संपणार नाही. फक्त रुग्णसंख्या कमी झाल्यास आम्हाला रुग्णांना उपचार देणे सहज होईल. खाटा रिकाम्या होऊ शकतील. मात्र, नागरिकांनी विशेषत: तरुणाईने मास्कवर अधिकाधिक भर दिला तर आपण सगळे मिळून कोरोनाला नक्कीच थोपवू शकतो. -डॉ. आनंद देशमुख, एमडी मेडिसिन, मेडिकोव्हर रुग्णालय

बातम्या आणखी आहेत...