आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्याय्य मागणी:वैद्यकीय प्रवेशाचा 70-30 कोटा रद्द; अकरावी प्रवेशाचा ‘बाजार’ गुंडाळला जाणार, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

अनिल पौलकर / प्रवीण देशपांडे | लातूर / परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करताना मराठवाड्यातील आमदार.
  • विधिमंडळ परिसरातील आमदारांच्या आंदोलनामुळे हालचालींना झाली होती सुरुवात

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय करणारा ७०-३० चा कोटा रद्द झाला आहे.राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेमध्ये यासंबंधी घोषणा केली. या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

निर्णयानंतर काय होणार?

यामुळे गेल्या काही वर्षांत बहरलेला बार्शी पॅटर्न तसेच इतर ठिकाणचा अकरावी प्रवेशाचा मांडला जाणारा बाजार गुंडाळला जाणार आहे. हे सूत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीचे आमदार राहुल पाटील, खासदार संजय जाधव यांनी विविध आंदाेलने केली. गत आठवड्यात आ. राहुल पाटील यांनी सर्वपक्षीय स्वाक्षरी माेहीमही सुरू केली हाेती. तर साेमवारी विधिमंडळ परिसरात मराठवाड्यातील आमदारांनी आंदाेलन केल्याने ७०.३० चे सूत्र रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले होते.

७०-३० चा फॉर्म्युला रद्द करण्याच्या मागणीसाठी मंत्र्यांना ईमेल, व्हॉटसअप, मेसेज करण्याचे आंदोलन करण्यात आले होते. त्यातच मराठवाड्यातील आमदारांनी विद्यार्थी-पालकांच्या रेट्यामुळे हा विषय अधिवेशनात लावून धरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा विषय सोमवारी अजेंड्यावर घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मराठवाड्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आता वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

बार्शी पॅटर्नचा बाजार बंद पडणार :

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी केवळ ३० टक्के कोटा असल्यामुळे शिक्षण लातुरात आणि प्रवेश शेजारील बार्शी तालुक्यातील महाविद्यालयात घेण्याचा एक नवा पॅटर्न गेल्या काही वर्षांत उदयास आला होता. सोलापूर, बार्शी, वैराग या मराठवाड्याला लागून असलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या गावांतील कनिष्ठ महाविद्यालयात केवळ प्रवेश घ्यायचा अन् लातूरमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये ट्यूशन घ्यायचे, असे प्रयोग व्हायचे. यासाठी बार्शी, वैराग तालुक्यातील या महाविद्यालयांत किमान २५ ते ४० हजार रुपयांपर्यंतचे शुल्क वसूल केले जायचे. एकदा प्रवेश घेतला की थेट परीक्षेसाठीच यायचे, असे या बाजाराचे स्वरूप होते. ७०-३० चा कोटा रद्द झाल्यानंतर ही दुकानदारी बंद पडणार आहे.

जागांचा असमताेल व अन्याय :

उर्वरित महाराष्ट्रात वैद्यकीय जागांचे प्रमाण हे तिपटीने जास्त (४१०० जागा) आहेत. याउलट मराठवाड्यात केवळ ९०० जागा आहेत. या सूत्रामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी गुणवत्ता असूनही जागा कमी असल्याने वंचित राहू लागला होता. मराठवाड्यात चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तर दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत . औरंगाबाद, आंबेजोगाई, लातूर व नांदेड या सहा महाविद्यालयांतून केवळ ६५० जागा आहेत तर लातूर व बदनापूर येथील दोन महाविद्यालयांतून २५० जागा आहेत. या तुलनेत मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्रात १३ शासकीय महाविद्यालये असून यात २३३० व खाजगी १४ महाविद्यालयांतून १७७० अशा एकूण ४१०० जागा आहेत. विदर्भातही ६ महाविद्यालयातून ११५० व खासगी महाविद्यालयांतून २५० आशा १४०० जागा आहेत. ही तफावत ७०.३० च्या सूत्रांमुळे तर मोठीच अन्यायकारक ठरते. या सूत्रानुसार त्या त्या भागातील विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा मिळतात तर मराठवाड्यातून जाणाऱ्या विद्यार्थ्याला ३० टक्के जागा मिळतात. मराठवाड्यातील जागा कमी असल्याने येथील विद्यार्थी स्थानिक पातळीवर ७० टक्के मध्ये बसू शकत नाही. परिणामी, तो केंद्रीय परीक्षेत चांगला गुणवत्ताधारक असतानाही वैद्यकीय प्रवेशापासून इतर ठिकाणी ३० टक्के जागांमध्ये बसत नसल्याने प्रवेशापासून वंचित राहतो.

प्रवेशासाठी स्थलांतरण

७०-३० च्या सूत्रामुळे गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी स्थलांतरित होऊ लागला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र वा राज्याच्या अन्य भागात एखाद्या साधारण महाविद्यालयात हे विद्यार्थी अकरावी-बारावीसाठी प्रवेश घेत आहेत. परिणामी त्या महाविद्यालयांना वाट्टेल ते शुल्क देण्याची वेळ पालकांवर येत आहे आणि इतर आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणावर सोसावा लागत आहे.