आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास भाजप-शिवसेनेशीही युतीची तयारी, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे स्पष्टीकरण

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ करण्यासाठी आमच्या पक्षाचेही माेठे याेगदान आहे, त्यामुळे या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, पण काेणता पक्ष सन्मानजनक प्रस्ताव देत असेल तर त्याच्यासाेबत जाण्याचीही तयारी आहे. अगदी शिवसेना- भाजप असला तरी चालेल, असे स्पष्टीकरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पक्ष प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी दिले.

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद शहरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये घटकपक्ष असूनही आम्हाला अपेक्षित सन्मान मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही वेगळी वाट निवडणार आहोत. पुण्यात नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी रणनीतीबाबत चर्चा झाली. आघाडी सरकारच्या काळात दलित, बौद्ध, आदिवासी या इतर मागासवर्गीयांवर अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली. राज्य सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही उद्रेक माेर्चा काढणार आहाेत, असा इशाराही प्रा. कवाडे यांनी दिला. या वेळी जयदीप कवाडे, जे.के. नारायणे, चरणदास मोरे, संजय सोनवणे, गणेश उनवणे, कपिल लिंगायत, लक्ष्मण कांबळे, सागर कुलकर्णी, महिला आघाडीच्या सुनीता चव्हाण आदी उपस्थित होते.

सवर्णांकडूनच अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग
अॅट्रॉसिटी कायद्याला अधिक सक्षम करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. राज्य शासनाने त्याची अमलबजावणी करावी. पण राजकीय फायद्यासाठी काही सवर्णांतील नेते या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे अॅट्राॅसिटी कायद्याची कठोर अंमलबजाणी झाली पाहिजे, असेही प्रा. कवाडे म्हणाले.

आठवलेंनी रिपब्लिकन ऐक्यासाठी आंबेडकरांकडे जावे
कही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले हाेते. त्यांनी तसे केल्यास मीही रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांच्यासोबत जायला तयार आहे, असे प्रा. कवाडे म्हणाले.

विद्यापीठ जागतिक ख्यातीचे व्हावे
ज्याच्या गेटची पूजा केली जाते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देशातील एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठातून सभ्य, समाजाभिमुख, तसेच मानवी मूल्यांचे जतन करणारा समाज निर्माण व्हावा. तसेच हे विद्यापीठ जागतिक ख्यातीचे होईल या दृष्टीने सरकारने काम करावे, अशी अपेक्षा कवाडेंनी व्यक्त केली.