आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालाच पाहिजे. तुम्ही बरोबर काम करत नाही म्हणून शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. यंदा या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना माफी नाहीच, असा इशारा राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी शुक्रवारी खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना दिला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने निधी शिल्लक राहतो. सर्व योजनांची कामे वेळेत करा, अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा तुमची काही खैरे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पैठण रोडवरील एनआरपीच्या सभागृहात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आढावा बैठक झाली. या वेळी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्याचे कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हानिहाय योजनांच्या कामांचे उद्दिष्ट व प्रत्यक्षात झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे अनुदान दिले जात नसल्याबद्दल जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली होती.शेतकरी विष्णू पवार यांना २०१९ पासून सिंचन योजनेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार केली. आढावा बैठकीतही याच विषयावर सर्वाधिक चर्चा झाली. त्यावर कृषी आयुक्तांनी अधीक्षकांना खडसावले. २० टक्क्यांपेक्षा जास्त निधी शिल्लक राहिला तर ताे परत घेतला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. थेरॉटिकल, प्रॅक्टिकल, सॉफ्टवेअरच्या अडचणी असल्याचेही त्यांनी सांगितले. बांधावर जाऊन सल्ला द्या रिक्त पदांची भरती, पदोन्नती, वाहनचालकांचे पगार आदी तुमचे प्रश्न मी सोडवतो, पण सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण आहे म्हणून शेतकऱ्यांची कामे तुम्ही रोखू नका. पाऊस, मशागत, शेतीच्या पोतनुसार लागवड व पेरणी करणे, बीज प्रक्रिया करणे आदी बाबींचा शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन योग्य सल्ला द्या, त्यांच्या अडचणी समजावून घ्या, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. आयुक्तांना डेटाचे विस्मरण पोकरा योजनेची किती कामे झाली, खरिपासाठी बी-बियाणे, खतांचे काय नियोजन केले आहे? निकृष्ट दर्जाचे खते बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणात आले आहे, ते पकडून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी काय नियोजन केले? याबाबत आयुक्तांनी विचारणा केली असता ‘डेटा माझ्या लक्षात राहत नाही. तुम्ही कृषी संचालकांना विचारा,’ असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.
पिकांच्या अचूक नोंदी घ्या, फोटो, व्हिडिओ शूटिंग करा पीक संरक्षण विमा योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती द्यावी. नुकसान हाेणाऱ्या पिकांच्या अचूक नोंदी, फोटो, व्हिडिओ शूटिंग करावी. त्याचा अहवाल जिल्हा समिती, विभागीय समिती, राज्य समितीकडे पाठवा. यात हयगय करू नका. नुकसानीच्या चुकीची माहिती देऊ नका, असे आयुक्तांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.