आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:महाराष्ट्र सरकार तयार असल्यास सरकारी शाळेतील शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देऊ, ‘सुपर थर्टी’चे संस्थापक आनंदकुमार यांची ग्वाही

औरंगाबाद / फेराेज सय्यद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील पोस्टात नाेकरीला, घरात आईवडील, भाऊ असे चाैघांचे कुटुंब. मी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर केंब्रिज विद्यापीठात निवड झाली. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे जाता आले नाही. हेच दु:ख उराशी बाळगून वडिलांचे निधन झाले. मग कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच पडली. पापड विक्रीसारखी छाेटी-माेठी कामे केली. मात्र आपल्यासारखी वेळ इतरांवर येऊ नये म्हणून ‘सुपर थर्टी’ ही संकल्पना राबवून गुणवंत मुलांना आयटीसह उच्च शिक्षणापर्यंत पाेहाेचवण्याचे काम सुुरू केले. यापुढे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे हेच माझे ध्येय आहे. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतल्यास येथील सरकारी शाळेतील शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देण्याची आपली तयारी आहे, असे ‘सुपर थर्टी’चे संस्थापक प्रा. आनंदकुमार यांनी सांगितले. दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद कार्यालयास साेमवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला. सीओओ निशित जैन यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रश्न : सध्या शिक्षण व शैक्षणिक संस्थांची काय अवस्था आहे?
आनंदकुमार : सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. शिक्षकांना काळानुरूप प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.

प्रश्न : खासगी शिक्षण संस्थांबाबतीत तुमचे मत काय?
आनंदकुमार : अनेक खासगी संस्था उत्तम शिक्षण देतात. परंतु काही शाळांमध्ये शिक्षकांना अत्यल्प पगार दिला जाताे. त्यांना याेग्य प्रशिक्षणही दिले जात नाही. परिणामी या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नाही. या शिक्षकांना प्रशिक्षित करायला हवे, त्यांच्या पगाराचाही विचार करावा. खासगी संस्थांवर शासनाने नियंत्रण ठेवण्याचीही गरज आहे.

प्रश्न : स्पर्धा परीक्षेत यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक यश कसे?
आनंदकुमार : इतर राज्यांपेक्षा उत्तर भारतात उद्याेग कमी असल्याने राेजगाराचा प्रश्न माेठा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन राेजगार मिळवण्याशिवाय पर्याय नसताे. शिकणाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरी जे शिकतात ते यशस्वी हाेतातच. इतर राज्यांतील विद्यार्थीही कुठे कमी आहेत असे नाहीच. पण या राज्यांमध्ये थोडे शिक्षण जरी घेतले तरी रोजगार मिळताे. तसेच तुमच्याकडे व्यवसायालाही भरपूर वाव आहे. कदाचित यूपी- बिहारमध्ये सरकारी नाेकऱ्या हाच एकमेव पर्याय असल्याने स्पर्धा परीक्षांकडे उमेदवारांचा कल जास्त दिसून येताे.

प्रश्न : ‘सुपर थर्टी’ पाटणापुरतेच मर्यादित का राहिले?
आनंदकुमार : नाही. भविष्यात ऑनलाइन शिक्षणाद्वारे देशभर जाळे विस्तारले जाणार आहे. त्याची प्राथमिक तयारीही केली आहे. देशभरातील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

प्रश्न : महाराष्ट्रात शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल का?
आनंदकुमार : महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतल्यास जिल्हा परिषद व सरकारी शाळांच्या शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देण्यास आपण तयार आहाेत. इतर प्रशिक्षित सदस्यांमार्फत हे प्रशिक्षण देता येऊ शकेल.

प्रश्न : तुमच्या नावाने महाराष्ट्रातील संस्थेने पुरस्कार सुरू केला आहे
आनंदकुमार : यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खोरे यांचा हा उपक्रम माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मराठवाडा व महाराष्ट्राच्या लाेकांसाठी अधिक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली, मी येथील लाेकांचा ऋणी आहे.

मुली शिकल्या तर देशाची प्रगती
अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी मुलींना शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षण व उच्च शिक्षण दिल्यास खऱ्या अर्थाने देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तर मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्तरावर पुरस्कार देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...