आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:भरपाई दिली नाही तर विमा अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकू, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल २० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यापैकी ९० टक्के पंचनामेही पूर्ण झाले आहेत. विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. या वेळी अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसान भरपाई न दिल्यास विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जेलमध्येच पाठवू, असा इशारा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी साेमवारी दिला आहे.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील नुकसानीची माहिती घेतल्यानंतर वडेट्टीवार पत्रकारांशी बाेलत हाेते. या बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महसूल उपायुक्त पराग सोमण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, ‘सततच्या पावसामुळे नुकसान वाढत आहे. पंचनामे लांबले तरी चालतील, पण ते पारदर्शक करण्याचे आदेश दिले आहेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव सुटणार नाही याची काळजी घ्यावी. बाेगस नावे यादीत येऊ नयेत. विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी येत आहेत. या कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी आधी पैसे भरलेले आहेत, त्यामुळे तर भरपाई फुकट देणार नाहीत. शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास विमा कंपन्यांना वठणीवर आणले जाईल. मस्ती करणाऱ्या कंपन्यांची गय करणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच केंद्र सरकारकडेही भरपाईचे निकष बदलण्याची विनंती केली आहे. एनडीआरएफचे निकष वाढवून ते किमान हेक्टरी १२ हजार रुपये करावेत, असे पत्र राज्य शासनाने केंद्राला पाठवले आहे. अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली. पशुसंवर्धन विभागातर्फे याची नोंद घेऊन शेतकऱ्यांना या जनावरांचीही भरपाई दिली जाईल,’ असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजपची कथनी अन‌् करणी वेगळी
ओबीसींबाबत केंद्राच्या भूमिकेवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, ‘केंद्राची कथनी आणि करणी वेगळी आहे. आरक्षणाबाबत फडणवीसांची भावना चांगली असेल तर त्यांचे अभिनंदन करतो. पण भाजपची भूमिका वेगळी आहे. आम्हाला हक्काचा डाटा दिला जात नाही. राज्यातील जनता खुळी नाही. त्यांना सर्व माहिती आहे.’

भाजप नेते निलंगेकरांनी आधी गुजरात राज्याचा अभ्यास करावा
महाविकास आघाडी सरकारवर विमा देत नसल्याचा आराेप भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला हाेता. त्याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, ‘निलंगेकरांचा अभ्यास नाही. भाजपशासित गुजरात राज्यात पीक विमा आहे का, शेतकऱ्यांना मदत मिळते का, याचा अभ्यास त्यांनी करावा. त्यासाठी त्यांनी सचिवासोबत बसावे आणि माहिती घ्यावी,’ असा टाेला लगावला.

बातम्या आणखी आहेत...