आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:समृद्धीवर 90 दिवसांत 40 अपघात, 120 चा वेग जीवावर का बेततोय? वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर / मंदार जोशी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला हाेऊन तीन महिने झाले. मात्र, अतिवेगामुळे या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगरातील बोरुडे आणि बर्वे कुटुंबांतील सहा जणांचा रविवारी याच मार्गावर शिवणी पिसा (ता. लाेणार) येथे अपघाती मृत्यू झाला. ‘दिव्य मराठी’च्या टीमने तज्ज्ञांना साेबत घेऊन दुसऱ्या दिवशी १३ मार्चला सकाळी या मार्गाची पाहणी करून अपघाताची कारणे जाणून घेतली. तेव्हा अतिवेगाची धुंदी अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे समाेर आले. शिवाय अपघात टाळण्यासाठी लेनची शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. १२० च्या वेगात तुमचे कारवरील नियंत्रण सुटले तर सावरण्यासाठी फक्त दाेन सेकंद मिळतात. त्यातही भीतीमुळे चालकाला बचाव करता येत नाही.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परिवहन अभियांत्रिकी आणि रस्ता सुरक्षेचे अभ्यासक प्रा. डॉ. राजाराम दमगीर यांनी समृद्धीवरून गाडी चालवताना चालकाने नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सूचना केल्या. डोक्यात स्पीडची धुंदी नसली की प्रवास सुखकर होतो. हे विसरल्यामुळेच अपघात होतो, असे ते म्हणाले. ‘दिव्य मराठी’चा चमू व तज्ज्ञ घटनास्थळी पोहाेचले तेव्हा रविवारच्या अपघाताच्या खुणा तशाच होत्या. रस्त्यावर घासलेले टायरचे निशाण, अपघातस्थळी पडलेली लहान मुलांची पाण्याची बाटली, चिवड्याचे पाकीट, आजीने नामस्मरणासाठी हातात घेतलेली तुळशीची माळ अपघाताची साक्ष देत हाेती. तुळशीच्या माळेला रक्तही लागले हाेते. ती पायाखाली येऊ नये म्हणून कोणीतरी ती बाजूला लटकवली होती.

मागील ९० दिवसांत झाले ४० अपघात

नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ राेजी झाले. त्यानंतर ११ डिसेंबर ते ११ मार्च या ९० दिवसांत ४० अपघात झाले. पहिल्या ४० दिवसांतच २० अपघात झाले. म्हणजे प्रत्येक दोन दिवसाला एक अपघात हाेताेय. मागील आठ दिवसांत आठपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. रविवारी एकाच अपघातात सहा, तर मागच्या आठवड्यात ट्रक कोसळून दोघांचा मृत्यू झाला. या मार्गावरील वेगमर्यादा १२० किमी प्रतितास आहे. यामुळे छाेटीशी चूक मोठी ठरू शकते. रस्ता चांगला आहे, पण अति वेग मारक ठरताेय.

शेवटच्या लेनमध्ये गाडी चालवताना सतर्क राहा

जेव्हा गाडीचा वेग १२० च्या पुढे असतो, लेन चुकते किंवा एखादे चाक रस्त्याच्या खाली उतरते तेव्हा नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त दोन सेकंदांचा वेळ मिळताे. त्यातही चालक एवढा घाबरलेला असतो की त्यामुळे गाडीचे नियंत्रण सुटून अपघात होतो. लेन सोडून गाडी वेगाने चालवल्यास एक चाक मातीवर जाते अन् गाडीचे नियंत्रण सुटते, असे डॉ. राजाराम दमगीर यांनी सांगितले.

लेन चुकल्याने झाला अपघात

समृद्धीची डावीकडची पहिली लेन जड वाहनांसाठी असून कमाल वेग ८० किमीचा आहे. त्याच्या बाजूला कार व इतर वाहनांची लेन असून वेग १२० चा आहे. उजवीकडे सर्वात शेवटची ओव्हरटेक लेन आहे. गाडीत बसल्यानंतर वेगाचा अंदाज येत नाही. १२० चा वेग कधी १३० च्या पुढे जातो हे कळत नाही. लेन कधी बदलते हेही समजत नाही. या कुटुंबासोबत असाच प्रकार झाला असावा. कारण घटनास्थळी गाडी डाव्या बाजूला पत्र्याच्या कठड्याला घासली. त्यानंतर नियंत्रण सुटून ५० फुटांचा रस्ता, दोन रस्त्यांमधील २० फुटांची झाडे लावण्याची जागा पार करून गाडी दुसऱ्या लेनवर पडली.

बातम्या आणखी आहेत...