आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्यास नजीकच्या महाविद्यालयातील विषय शिक्षकाद्वारे तपासणीसाठी बोर्डाची परवानगी आवश्यक

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • पुनर्मूल्यांकनासाठी होणारी विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मूंल्याकनाचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद विभागीय मंडळात आत्तापर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी एक हजार; तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी दोन हजार आठ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, अर्ज करताना अनेक विद्यार्थी व पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी मंडळाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. या तक्रारींची दखल घेत तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी मंडळाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्या बंद असलेल्या शाळा-महाविद्यालयांची स्थिती पाहता शिक्षक मिळत नसल्यास विद्यार्थी बोर्डाची परवानगी घेवून जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विषय शिक्षकांची मदत घेवू शकतील असे विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर मंडळाने १७ जुलैपासून विद्यार्थांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थांना विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज करायचे आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी २७ जुलैपर्यंत मुदत होती, तर उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र अर्ज भरताना संकेतस्थळ न उघडणे व शुल्क भरण्यासही अडचण येत असल्याने पालक त्रस्त झाले आहे.या तक्रारीची दखल घेत शिक्षण मंडळाने संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. असे असंताना मिळालेल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पुन्हा तपासणे आणि मिळालेल्या गुणांच्या बेरची पुर्नपडताळणी करतांनाही अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना बोर्डाने दिलासा दिला आहे. नजीकच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची मदत विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा परवड थांबणार

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्याला बोर्डाकडून उत्तरपत्रिकेची झेरॉक्स व बोर्डाचे फॉर्म असे तीस पानांचा मेल केला आहे. मुलांना उत्तरपत्रिका संबंधित विषयाच्या शिक्षकाकडून तपासून घेतल्यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी व शिक्का घेवून बोर्डाला परत पाठवायचा असतो. परंतु सद्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून शिक्षक, प्राध्यापक कोरोना ड्युटी असल्यामुळे मंडळाने कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का फॉर्मवर घेतला तरी ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच स्वतःच्या महाविद्यालय अथवा दुसऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वाक्षरी न दिल्यास विद्यार्थ्यांनी स्वतः बोर्डाच्या सचिवांच्या नावाने अर्ज केला तरी त्याचा विचार केला जाणार आहे. पण, विद्यार्थ्यांनी दिलेले कारण योग्य असावे, असे विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी म्हटले आहे.