आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:आक्रोशाचा स्फोट झाला तर सत्तेचे जहाज बुडेल ; धनगर समाज मेळाव्यात डॉ. महात्मे यांचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये देण्याचे अश्वासन देऊन तीन वर्षे लाेटली तरी निधी मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील समाजबांधवांच्या आक्रोशाचा स्फोट झाला तर सत्ताधाऱ्यांचे जहाज बुडू शकते, असा इशारा भाजपचे माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी दिला.

धनगर समाजाचा आक्रोश मेळावा रविवारी हर्सूलच्या मैदानावर पार पडला. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती हाेती. दुपारी बारा वाजपासूनच लोक मेळाव्यासाठी हजर होते. मात्र, मंत्री अडीच वाजता आले.

या वेळी डॉ. महात्मे म्हणाले, धनगर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी हा मेळावा घेत आहाेत. एसटी आरक्षणाची मागणीही सरकारने पूर्ण केली नाही. मंत्री सावे म्हणाले, गेल्या तीन महिन्यांत ओबीसींचे अनेक प्रश्न सोडवले. ओबीसीची फेलोशिप पूर्वी चारशे होती. आता ती १५०० केली. यासाठी शासनाचा खर्च ३८० कोटी वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना फक्त घ्यायचे माहीत होते, द्यायचे नाही. त्यामुळे आम्ही धनगर समाजाला एक हजार कोटी मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. कराड यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दानवे म्हणाले, भुमरेंनी तेव्हा कामे का केली नाहीत : भुमरे म्हणाले, आरक्षण आणि निधीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काहीच झाले नाही. शेवटच्या टप्यात सव्वा चार वाजता कराडांच्या भाषणाच्या वेळी अंबादास दानवे व्यासपीठावर आले. तेव्हा सर्व मंत्री निघून गेले. शेवटच्या भाषणात दानवे यांनी सर्वानाच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, महाविकास आघाडीत भुमरे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे बोलणे सोपे असते, पण करणे किती अवघड असते हे सगळ्यांना माहिती असेल. धनगर समाजासाठी २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांचा काळात अध्यादेश काढला होता. आता तेच अर्थमंत्री आहेत. बारामतीत शरद पवारांच्या घरावर फडणवीसांनी काढलेल्या मोर्चात आमचे सरकार आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले. पुढे काहीच झाले नाही, अशी टीका त्यांनी केली.

आता आमच्या हाती काठी घेण्याची वेळ येऊ देऊ नका माजी आमदार रामराव वडकुते म्हणाले, काठी आणि घोंगडी देवून मंत्र्याच्या सत्कार केला आहे. मात्र समाजाच्या मागण्यांसाठी काठी हातात घ्यायची वेळ आमच्यावर येवु देवू नका. जिल्हाध्यक्ष रंगनाथ राठोड, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्यासह अनेकांनी समाजाच्या प्रश्नाबाबत भूमिका मांडली.

बातम्या आणखी आहेत...