आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा पवित्रा:शहरासाठी नियमित पाणी नाही, तर पाणीपट्टीसुद्धा मिळणार नाही; प्रशासकांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दहा दिवसांआड पाणी येते. तेदेखील गढूळ. त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. काहींचा तर मृत्यू झाला. नाशिक- पुण्यात रोज पाणी आहे, परंतु औरंगाबादला चार हजार रुपये पाणीपट्टी वसूल करूनदेखील शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी नाही, तर पाणीपट्टीसुद्धा मिळणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेत १ एप्रिल रोजी मनपा प्रशासकांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दुपारी ३ वाजता निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यकर्त्यांना बोलावले होते. मात्र, वेळ देऊनही पांडेय उपस्थित न राहिल्याने पदाधिकाऱ्यांनी संतप्त होऊन प्रशासकांविरोधात दोन तास जोरदार घोषणाबाजी केली. तसेच प्रशासकांना सामान्यांसाठी वेळ नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी केला. या वेळी माजी नगरसेवक काशीनाथ कोकाटे, इलियास किरमाणी, अंकिता विधाते, मयूर सोनवणे, वीणा खरे, छाया जंगले आदींची उपस्थिती होती. अखेर फोनवर प्रशासक पांडेय यांच्याशी पदाधिकाऱ्यांचे बोलणे झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी निवेदन स्वीकारले.

व्हॉट्सअॅपद्वारे निवेदन मागवले : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्यांना शुक्रवारची दुपारी ३ वाजेची वेळ दिली होती. मात्र, प्रशासकांना महत्त्वाचे काम असल्यामुळे ते मनपा मुख्यालयात येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सोमवारी भेटण्यासाठी या, असा निरोप पदाधिकाऱ्यांना सकाळी साडेअकरा वाजता मिळाला होता. मात्र, प्रशासकांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन स्वीकारण्याचे आदेश दिले व तत्काळ व्हॉट्सअॅपद्वारे निवेदन मागवून घेतले, अशी माहिती प्रशासकांचे स्वीय सहायक शंकर मरापे यांनी दिली.

निरोप मिळाला होता, सोमवारी प्रशासकांना निवेदन देणार
प्रशासकांना अचानक महत्त्वाचे काम आल्यामुळे ते शुक्रवारी भेटणार नाहीत, असा निरोप मिळाला होता. मात्र, निवेदन देण्याचे पूर्वनियोजित होते. प्रशासकांनी सोमवारचा वेळ दिल्याचा निरोप सगळ्यांपर्यंत पोहोचला नसावा. त्यामुळे काही पदाधिकारी मनपा कार्यालयात आले. सोमवारी प्रशासकांना निवेदन देण्यात येईल. अभिषेक देशमुख, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी

बातम्या आणखी आहेत...