आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वांच्याच आयुष्यात अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून संघर्ष करावा लागतो. जिद्द, चिकाटी ठेवून स्वत:तील चुका शोधल्यास यश हमखास मिळते, असे प्रख्यात अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी सांगितले. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळाले म्हणजे कोणी प्रसिद्ध, यशस्वी व्यक्ती होत नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘वाय’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्या औरंगाबादेत आल्या होत्या. त्या वेळी दिव्य मराठी प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या की, तत्त्वांशी एकनिष्ठ असले पाहिजे. मुलींनी नवीन कामासाठी विचार स्पष्ट ठेवावेत. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून लाइक्स, कमेंट्स मिळतात. परंतु फक्त फॉलोअर्स मिळाल्याने व्यक्ती प्रसिद्ध, यशस्वी होत नाही. दुसरीकडे ज्यांना फॉलोअर्स मिळत नाहीत ते निराशेच्या खाईत जातात. त्यांचा खरा प्रश्न आहे. विविध क्षेत्रांत धडपडताना कामातील चुका दिसायला हव्यात. म्हणजे त्या टाळून चांगली तयारी करता येते. अनेकदा हिंदी सिनेमासाठी माझी ऑडिशन फसते. तेव्हा आपण कुठेतरी कमी पडलो, असे समजून मी जास्त तयारीने पुढे जाते. लवकरच माझा ‘आपडी थापडी’ सिनेमा येत असून खूप लोकप्रिय झालेल्या मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाच्या चौथ्या भागाची संहिता तयार होत आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रांतवाद नाही आज मराठवाड्यातील अनेक कलाकारांना मुंबईच्या मराठी सिनेसृष्टीत काम मिळत आहे. तेथे प्रांतवाद नाही. फक्त काम करण्याची जिद्द असायला हवी, असे सांगत मुक्ता म्हणाल्या की, २४ जूनला प्रदर्शित होणारा ‘वाय’ सिनेमा म्हणजे थरार, रहस्याचे मिश्रण आहे. कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांचे असून यात प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक या नामवंतांसोबत रोहित काकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले या नवख्यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.