आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड जिंकायचे असेल तर कन्नडला रेल्वे आणा:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे केंद्रीय मंत्री दानवेंना आवाहन

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्यासोबतचे वाद बाजूला ठेवून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कन्नडसाठी रेल्वे सुरू करावी, असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. दानवेंना जर कन्नड जिंकायचे असेल तर माझ्यासोबत त्यांचे जे काही वैयक्तिक वाद, न्यायालयीन विषय असतील ते बाजूला ठेवावे आणि कन्नडसाठी रेल्वे सुरू करावी. कायमस्वरूपी कन्नड तुमचे आणि मी तुमचाच होईन. रेल्वे धावेल त्या दिवशी तुमच्या पायावर लोटांगण घेईन, अशी पोस्ट त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर टाकली आहे.

त्यात जाधव यांनी म्हटले आहे की, दानवे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी तालुक्यातील देवगाव रंगारी येथे येत असल्याने माझे हे आवाहन आहे की, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने सांगतात की रेल्वे सुरू करा. त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे. प्रत्येक मंत्री आपल्या भागात जास्तीचे काम करत असतो. ही दिल्लीची परंपरा आहे. त्यानुसार आपण रेल्वेचा प्रश्न सोडवावा. दानवे यांची इच्छा आहे की हर्षवर्धन जाधव यांनी माझ्या पायावर लोटांगण घ्यावे. मी तुमच्या पायावर लोटांगण घेतो. तुम्ही पहिल्यांदा रेल्वे सुरू करा. मला कुठलाही अहंकार नाही. आपसातील वाद महत्त्वाचे नाहीत.

भेट घेण्याची इच्छा
जाधव म्हणाले की, दानवेंना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्याची माझी इच्छा आहे. रविवारी दहापर्यंत भेटण्याची परवानगी दिली तर ठीक. नाही मिळाली तर भाजपच्या तालुका अध्यक्षाकडे ते निवेदन देण्यात येईल. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रावसाहेब दानवे देवगाव रंगारी येथील कार्यक्रमात जाधव यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता प्रत्युत्तर देतील. त्या साठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...