आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:पंचायत समिती घोटाळा प्रकरणात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा; नव्या जिल्हाधिकाऱ्यांना अहवालासह हजर राहण्याचे हायकोर्टाचे आदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेगा योजनेत २०११ ते २०१९ या कालावधीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. मात्र या प्रकरणात चौकशी न करता केवळ कागदपत्र जमा केले आणि न्यायालयाचा अवमान केला असा ठपका कोर्टाने ठेवला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून पारदर्शी चौकशी होण्याची शक्यता नसल्याचे सांगत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची तातडीने बदली करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्या खंडपीठाने राजकुमार देशमुख यांच्या याचिकेवर हे आदेश दिले. बीड जिल्हा २०११ ते २०१९ या कालावधीत पंचायत समितीच्या नरेगात मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचे सांगत या चौकशीसाठी देशमुख यांनी गेल्या वर्षी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने २१ जानेवारी २०१९ रोजी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र राजकीय दबावापोटी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही.

अनेक दिवस यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे २५ जून रोजी जगताप यांनी शपथपत्र दाखल करून चौकशी समिती गठित केल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर काल झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र सादर केले. मात्र, त्यात नोंदवलेली निरीक्षणे पाहून न्यायालयाने रवींद्र जगताप यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या कार्यकाळात या प्रकरणाची पारदर्शी चौकशी होणे शक्य नाही, असे ताशेरे ओढत त्यांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नवीन सूचना आम्ही जिल्हाधिकार्‍यांना देऊ असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. गिरीश नाईक थिगळे यांनी काम पाहिले.

बऱ्याच प्रमाणात सखोल चौकशीची कामे पूर्ण
बीड पंचायत समिती नरेगा प्रकरणाची चौकशी मोठी आहे. त्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याचे आम्हाला सांगितले होते. कोरोनामुळे त्या कामाची गती कमी असावी. मात्र आम्ही आमच्या स्तरावर बऱ्याच प्रमाणात सखोल चौकशीची कामे पूर्ण केलेली आहेत. - रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.

बातम्या आणखी आहेत...