आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच घरगुती गणेशमुर्ती विसर्जनासाठी फिरत्या वाहनांमध्ये कृत्रीम तलाव तयार केले आहेत. या ठिकाणीच गणेशमूर्ती विसर्जन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केली आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात 980 ठिकाणी गणेश मूर्ती स्थापना झाली आहे. यामध्ये 286 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे. सर्व ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना शांततेत पार पडली आहे.त्यानंतर आता कोविडच्या नियमांचे पालन करून गणेशमूर्ती विसर्जना बाबत पोलीस प्रशासनाने स्वतंत्र जनजागृती सुरू केली आहे.
पोलिस अधीक्षक राकेश कलासागर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह पालिकेच्या पथकाने विसर्जन मार्गाची तसेच तलावांची पाहणी केली. यासंदर्भात पोलीस अधिक्षक कलासागर यांनी गणेश मंडळांना आवाहन केले यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी कयाधू नदी, जलेश्वर तलाव तसेच सिरेहकशहा बाबा तलाव या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करता येईल मात्र त्यासाठी मिरवणूक काढता येणार नाही. यासोबतच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाच्या सहकार्याने फिरत्या वाहनामध्ये कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तीन वाहनांमधून अशा प्रकारचे कृत्रिम तलाव केले असून हे तलाव शहरात सर्व प्रभागात फिरणार आहेत. या ठिकाणीच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करावे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नाही. त्यामुळे कुठल्याही गणेश मंडळांनी गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यासाठी मास्क व सॅनेटायझरचा वापर करावा. नागरिकांना काही अडचणी असल्यास किंवा संशयास्पद व्यक्ती तसेच वस्तू आढळून आल्यास तातडीने पोलीस विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांनी जातीय सलोखा राखावा. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट टाकू नये. पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.