आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतत दुचाकीवर कार्यालयात अाल्याने पाठीचा त्रास वाढला अाहे. त्यामुळे घाेड्यावर बसून कार्यालयात येण्याचे नियाेजन अाहे. त्यामुळे घाेडा बांधण्यासाठी कार्यालय परिसरात परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांच्याकडे पत्राद्वारे केली. ते पत्र राज्यभरात व्हायरल झाल्यावर सरकारी बाबूंना त्यांच्याच भाषेत परवानगीच्या नियम व अटींचे एकाहून एक मीम्स सोशल मीडियावर पडू लागले आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वच ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलन केले जात अाहे. देशमुख यांच्या मागणीला नेटकऱ्यांनी इंधन दरवाढीशीउर्वरित. जाेडले तर कुणी घाेडा बांधण्यासाठी किती सरकारी परवानग्या घ्याव्या लागतील याची यादीच शेअर करत हाेते. लेखाधिकारी देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातील घोडाकामठा (ता. कळमनुरी) येथील मूळ रहिवासी. नांदेड शहरात तरोडा (बु.) परिसरातील गजानन महाराज मंदिर भागात ते राहतात.
घोड्याचा रंग, उंची सांगा; त्याच्यासाठी एसी बसवण्याचा सल्ला : देशमुख यांचे पत्र व्हायरल होताच सरकारी बाबू ज्याप्रमाणे परवानग्या सादर करण्यासाठी सरबत्ती करतात तसे घोडा बांधण्यासाठी नियम, अटींची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात घोडा खरेदीसाठी परवानगी घेतली का, घोड्याचा रंग, उंची किती असेल, वन्यजीव विभागाने मान्यता दिली का, घोड्याची घाण कोण काढणार, वन्यजीव कायद्यानुसार घोड्यासाठी एसी बसवा, घोडा बांधण्यासाठी निवडलेल्या जागेचा नकाश, उतारा सोबत जोडण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला. घोडा उधळला तर जबाबदारी कोणाची असेल याचे स्पष्टीकरण काही जणांनी मागितले. काहींनी तर मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
अस्थिव्यंगोपचारशास्त्र तज्ञांचे लेखी उत्तर, म्हणे- मणक्याची गादी सरकेल : देशमुख यांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनही कामाला लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र लिहून घोड्यावर प्रवास केल्याने पाठीच्या कण्याचा त्रास कमी होऊ शकतो की नाही यावर अभिप्राय मागवला. त्यावर रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुखांनी उत्तर पाठवले. यात पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखी आदळआपट होऊन मणका दबण्याची किंवा मणक्यातील गादी सरकण्याची भीती व्यक्त करत हा आजार आणखी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली.
मागणीचा विपर्यास
माळेगाव यात्रेत गेल्यावर नेहमी घोडा घेण्याची इच्छा होत होती. त्या वेळी आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते. आता घोड्याच्या किमतीही कमी झाल्याने घेणे शक्य आहे. मला आवड असून पाठदुखी कमी व्हावी म्हणून मी परवानगी मागितली आहे. माझ्या मागणीचा विपर्यास केला गेला. - सतीश पंजाबराव देशमुख, सहायक लेखाधिकारी (रोहयो), जिल्हा. कार्यालय, नांदेड
कार्यालय ते घरापर्यंतचा रस्ता चांगला, पण....
कार्यालयापासून देशमुख यांच्या घराचे अंतर साधारण ५ किमी अाहे. त्यासाठी ते दुचाकीचा वापर करतात. त्यांच्या घराकडे जाणारा मार्गही तसा चांगला अाहे. पण सतत बैठे काम असल्याने ५ ते ६ वर्षांपासून त्यांना मान व पाठदुखीचा त्रास सुरू झाला. ताे कमी व्हावा म्हणून कार्यालयातही ते साधी लाकडी खुर्ची वापरत अाहेत. ते रोज योगाही करतात. याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही उपचार घेत नाही,असे त्यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले. दरम्यान, देशमुख यांच्या मागणीचे पत्र मिळाले असून त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.