आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरच्या दंगलीचे मास्टर माइंड तुम्हीच...तुम्हीच ही दंगल घडवली.... लोकांना सारे कळते...तुम्ही दंगलीचे राजकारण करत आहात...असे आरोप-प्रत्यारोप अवघ्या चार दिवासांपूर्वी एकमेकांवर करणारे आणि एकमेकांना अक्षरशः पाण्यात पाहणारे ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि एमआयएमच्या नेत्यांचे शुक्रवारी एकाच व्यासपीठावर चांगलेच गुळपीठ जमले. त्यांच्यातल्या गप्पा, हास्यविनोद पाहून उपस्थितांना धक्काच न बसता तर नवल.
खरेच हेच नेते एकमेकांवर शत्रूगत तुटून पडत होते का? दंगलीचे आरोप करत होते का, असा सवाल यावेळी अनेकांना पडला. विशेष म्हणजे कार्यक्रमावेळीही अशी कुजबुज ऐकायला मिळाली. त्यामुळे नेमके कुठले राजकारणी खरे, या बुचकळ्यात अनेक जण पडले.
नेमके झाले काय?
छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात आज अवयदानाचा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या गुलुगुलु गप्पा रंगल्या.
सांग माझ्या कानात...
भाजपचे गिरीश महाजन आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या यावेळी चांगल्याच गप्पा रंगल्या. इम्तियाज यांनी महाजनांशी चक्क कानगोष्टी केल्या. अंबादास दानवे यांच्याशीही कानगोष्टी केल्या. त्यामुळे चारच दिवसांपूर्वी एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे ते हेच नेते का, असा सवाल मनात निर्माण झाल्याशिवाय राहिला नाही. महाजनांचा सत्कार करताना इम्तियाज यांनी अशी कोपरखळी मारली की, अक्षरशः महाजनांनी टाळीसाठी हात पुढे केला.
अजून यौवनात मी...
घाटी रुग्णालयाच्या अवयवदानाचा कार्यक्रम. सध्या घाटीचे वय 67 झाले आहे. याचा उल्लेख संयोजकांनी केला. हाच धागा पकडत गिरीश महाजन यांनी आपले वय 67 वर्षे नसल्याचे सांगितले. तेव्हा इम्तियाज जलील यांना महाजनांचे वय अवघे 36 वर्षे आहे, हे सांगायचा मोह आवरला नाही. तेव्हा उपस्थितांनीही भरभरून दाद दिली.
तेव्हा विवेक कुठे?
राजकारणी सुसंस्कृत, दुसऱ्याला पाण्यात न पाहणारा असावा म्हटले जाते. मात्र, अगदी चार दिवसांपर्यंत चक्क दंगलीसारख्या अतसंवेदनशील आणि गंभीर विषयावरून एकमेकांवर चक्क मास्टरमाइंड असल्याचे आरोप केले. मग खरेच दंगलीचे मास्टरमाइंड असणाऱ्या नेत्यांसोबत इतके गुळपीठ जमतेच कसे? तसे नसेल, तर असे आरोप करताना हा विवेक जातो कुठे? या आरोप-प्रत्यारोपांनी सामाजिक सौहार्द बिघडत नाही का? असा सवाल अनेकांच्या मनी आला. मात्र, याचे उत्तर या कार्यक्रमातून काही मिळाले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.