आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगरला विरोध:इम्तियाज जलीलांनी घेतली कपिल सिब्बलांची भेट, औरंगाबादच्या नामांतराची लढाई सुप्रीम कोर्टात?

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामांतर प्रकरणी खासदार इम्तियाज जलील व मुस्ताक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांची आज दिल्लीत भेट घेतली. औरंगाबाद नामांतराबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दिल्लीतल्या या गाठीभेटीनंतर छत्रपती संभाजीनगराच्या नामांतराची कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कायदेशीर लढाई

औरंगाबादच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी सुरू केलेले साखळी आंदोलन 14 दिवसांनंतर मागे घेतले. त्यानंतर लगेच आज कपिल सिब्बल यांच्याशी दिल्लीत भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात औरंगाबाद नामांतर संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात येणार असल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, शुक्रवारी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना याचे संकेतही दिले होते. नामांतराला विरोध असून कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

उपोषण मागे का घेतले?

उपोषण मागे घेण्याचे कारण सांगताना जलील म्हणाले की, रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी हिंदू संघटनांचा मोर्चा आहे. त्यात काही चिथावणीखोर भाषणे करणारी व्यक्ती बाहेरून येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. अशावेळी शहरातील वातावरण खराब होऊ नये ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही साखळी उपोषण स्थगित करत आहे. तसेच आमच्या निर्णयानंतर जर कोणी काही चिथावणीखोर भाषणे केल्यास त्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ असेही जलील म्हणाले आहेत.

सकल हिंदू समाजाचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ उद्या सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. संत, धर्माचार्यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून या मोर्चास सुरुवात होईल. 24 फेब्रुवारी रोजी शहराच्या छत्रपती संभाजीनगर नामांतरावर शिक्कामोर्तब झाले.

कोणालाही विरोधी नाही

विविध धर्माचार्यांसह सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडली. हा माेर्चा कोणत्याही धर्म, नेत्याविरोधात नसून केवळ देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला समर्थन देण्यासाठी असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. हजारोंच्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...