आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIM भाजपची 'बी' टीम नाही:दंगल राजकारणासाठी केली जाते, माझ्यावर आरोप लावणारे काही गोष्टी लपवत आहेत - इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराडपुऱ्यातल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केवळ मी आणि माझ्या पक्षाने केली. कारण आम्हाला मला लोकांसमोर सत्य आणायचे आहे. जे लोक माध्यमांना मुलाखती देत आहेत व माझ्यावर आरोप करत आहेत, ते काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे.

किराडपुऱ्यातील घटना भयानक स्वप्न

इम्तियाज जलील म्हणाले, किराडपुऱ्यातील त्या दिवशीची घटना एक भयानक स्वप्न होते, असे समजून आपण ती गोष्ट विसरायचा प्रयत्न करूया. ती निंदनीय गोष्ट आहे. मी जे काही काम केले ते काम माझा धर्म शिकवतो. मुस्लीम धर्माने इतर धर्मांचा आदर करण्याची जी शिकवण दिली त्याचे मी अनुकरण केले. माझ्या शहरात शांती असावी हे मी शहराचा नागरिक या नात्याने केले आहे.

काही लोक शांतता भंग करीत आहेत

इम्तियाज जलील म्हणाले, माझ्या देशाची सुंदरता हीच की, एकाच महिन्यात रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, गुडफ्रायडे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते. हे सारे उत्सव एकत्र येतात. त्यामुळे आपली परंपरा आहे की, हे सण एकत्रित साजरे करायला हवे पण काही लोक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मला सत्य लोकांसमोर आणायचे

इम्तियाज जलील म्हणाले, मी आणि एमआयएम पक्ष एकमेव आहे की, किराडपुऱ्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सरकारकडे करीत आहे. कारण मला सत्य लोकांसमोर आणायचे आहे. जे लोक माध्यमांना मुलाखती देत आहेत व माझ्यावर आरोप लावत आहेत ते काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. उलट त्यांनी माझ्या मागणीचे समर्थन करायला हवे. पण ते समर्थन करीत नाही म्हणजेच लोकांनाही ते काय आहेत हे समजले आहे.

अजूनही पोलिसांकडे उत्तर नाही

इम्तियाज जलील म्हणाले, पंधरा पोलिस आणि अनेक युवक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांच्या तेरा गाड्या आल्या. पण त्या रिकाम्या तर नव्हत्या ना...जर त्यात पोलिस होते तर ते त्यावेळी कुठे होते? ते काय करीत होते. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. माझ्यासोबत पंधरा पोलिसवाले होते. त्यांच्यावर मंदिराची जबाबदारी आणि बाहेरच्या लोकांवर नियंत्रण मिळवणे हे दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर होती.

दंगल कुणाच्याच फायद्याची नाही

इम्तियाज जलील म्हणाले, दंगे, जाळपोळ हे कुणाच्याच फायद्याचे नाही. ते राजकारणासाठी केले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. 99 टक्के लोकांचे याच्याशी काहीच संबंध नसतो. एक दोन टक्के लोक सर्वच धर्मांत आहेत ते वातावरण खराब करतात. सोशल मीडियात दुकान चालवतात.

..म्हणून ते आम्हाला मविआत घेणार नाही

इम्तियाज जलील म्हणाले, एनसीपी, काॅंग्रेस वारंवार एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा आरोप करीत आहेत. पण आम्ही त्यांना यापूर्वीच ऑफर दिली होती की, आम्ही तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत आम्हाला तुम्ही निमंत्रण तर द्या. पण त्यांनाही हे माहीत आहे की, मुस्लीमांची मते त्यांना मिळणार नाही. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत.