आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलटवार:‘हुकूमशाही’ अधिकाऱ्यांची पाठराखण करणे अशोभनीय, इम्तियाज जलील यांचे पालकमंत्र्यांना प्रत्युत्तर

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एक आणि जिल्ह्यात वेगळाच नियम लावून दहशत निर्माण करणाऱ्या, हुकूमशाही गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणे हे पालकमंत्री सुभाष देसाई यांना शोभत नाही, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन कितीही गुन्हे दाखल केले तरी संकटसमयी सामान्य माणूस, व्यापारी कुणीही असला तरी त्याला मदत करण्याचे काम मी सुरूच ठेवले, असेही इम्तियाज यांनी म्हटले आहे.

सील केलेल्या दुकानांवरील कारवाई तातडीने मागे घ्यावी या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज यांनी जलील कामगार उपायुक्त कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना अरेरावी केली होती. तसेच महिला पाेलिसाशी असभ्य वागल्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला हाेता. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी बुधवारी ‘कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांची पाठराखण करणे लोकप्रतिनिधींसाठी अशोभनीय आहे’ अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार इम्तियाज म्हणाले, लॉकडाऊनमध्ये अनेक दुकानदार, कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा प्रशासन कुठे होते? बेकायदेशीरपणे उघडणाऱ्या दुकानांना सील ठोकले होते. हे सील उघडताना २०० रुपये प्रतिचौरस फूट या दराने दंड लावला. सामान्य दुकानदारांना ५० हजार तर मोठ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत दंड आकारला. यामुळे अनेकांवर आत्महत्येची वेळ आली असती. मिलन मिठाई हे एक मोठे दुकान आहे. या दुकानाचे सील १२ तासांत कसे उघडले? राज्यात एक नियम आणि स्थानिक प्रशासनाचा वेगळाच कायदा आहे का? बेकायदेशीर सुरू असलेल्या दारू दुकानांना सील का लावले नाही?

कितीही गुन्हे दाखल केले तरी मी माझे काम सोडणार नाही
अनेक रुग्णालयांनी सामान्य रुग्णांना अक्षरशः लुटले. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या. प्रशासनाने कुठल्या रुग्णालयावर कठोर कारवाई केली? या लुटीतही जिल्हा प्रशासनाचा सहभाग होता का? असा सवाल खासदारांनी केला. तसेच सामान्य नागरिकांसाठी काम करण्यासाठीच जनतेने मला निवडून दिले आहे. राजकीय हेतूने माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी माझे काम सोडणार नाही, असेही त्यांनी देसाई यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...