आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्तियाज जलीलांचा 'राष्ट्रवादी'वर निशाणा:लोकभावनेसाठी त्यांनी साॅफ्ट हिंदुत्व स्वीकारले, खरे तर ते हार्ड लाइनचे आहेत

औरंगाबाद | फेरोज सय्यदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘लोकभावना, मतांच्या गणितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने साॅफ्ट हिंदुत्व स्वीकारण्यात चुकीचे काय,’ असा थेट प्रश्न दिव्य मराठीने खासदार इम्तियाज जलील यांना विचारला. त्यावर इम्तियाज म्हणाले की, धार्मिक परंपरा, रूढींचे पालन करणे याला काहीच हरकत नाही. वरकरणी त्यांचे हिंदुत्व साॅफ्ट वाटते, पण खरे तर ते हार्ड लायनर आहेत.

पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून हिणवण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारमध्ये सामावून घ्या, अशी मागणी इम्तियाज यांनी केली. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला.

राष्ट्रवादीचे साॅफ्ट हिंदुत्व

दोन दिवसांपूर्वी एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार फौजिया खान, टोपे यांनी इम्तियाज यांना राष्ट्रवादीसोबत येण्याचे पुन्हा आवाहन केले. त्यास नकार देत राष्ट्रवादी साॅफ्ट हिंदुत्वाकडे वळत असल्याचे मत इम्तियाज यांनी व्यक्त केले.

वरून साॅफ्ट आतून हार्ड

आपला मुद्दा स्पष्ट करताना जलील म्हणाले की, स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या पक्षांना असे वागता येणार नाही. म्हणूनच त्यांचे वरून साॅफ्ट आतून हार्ड हिंदुत्व चुकीचे आहे. बदलत्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या वाटेवर पुढे जात आहे. औरंगाबादचे नामांतर झाले नसतानाही खासदार सुप्रिया सुळे एका ट्वीटमध्ये ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख करतात. बीड जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेचा जयंत पाटील विधानसभेत हिंदू देवी-देवतांची मालमत्ता असा उल्लेख करतात. तेथील पोलिस अधीक्षकाच्या बदलीचा आग्रह धरतात.

धर्मनिरपेक्ष म्हणवून घेता

ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत ते शिवसेनेसोबत गेले. तेव्हाच त्यांचा खरा चेहरा जगाला दिसला होता. आता त्यांनी केवळ देखाव्यासाठी सेक्युलॅरिझमचे गाणे म्हणणे बंद करावे. त्यांनाही बहुसंख्याक हिंदूंच्या व्हाेट बँकेचीच चिंता आहे. भाजप-शिवसेनेसारखे हिंदुत्वाचे राजकारण करण्याचे त्यांचे धोरण त्यांचेच नेते दाखवून देत आहेत. नामांतरावरून त्यांना औरंगाबादमध्ये परिणाम दिसून येईल.

बातम्या आणखी आहेत...