आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, या आंदोलन स्थळी एक तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन आला. मात्र, त्याला आयोजकांनी तात्काळ पिटाळून लावले.
आंदोलन स्थळी नामांतराला विरोध करत इम्तियाज जलील म्हणाले की, माझे नाव तुम्ही शहराला देऊन मला मोठे करा असे संभाजी महाराजांनी सांगितले होते का? ते महापुरूष आहेत यात काहीही दुमत नाही. त्यांचा आदर करण्यात कोणताही वाद नाही, पण त्याबाबत सुरू असणाऱ्या राजकारणाविषयी आक्षेप आहेत.
जन्मलेल्या लोकांच्या भावना
खासदार इम्तियाज जलील पुढे म्हणाले, नामांतरामागे काहीतरी संबंध असायला हवा. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध होता? त्यांनी ना इथे जन्म घेतला ना त्यांचा इथे मृत्यू झाला होता. त्यांनी इथे काही कामे केली का? तर तसेही दिसत नाही. केवळ 30 वर्षांपूर्वी एका राजनैतिक पक्षाचा नेता या शहरात येतो आणि तो असे म्हणतो की मला या शहराचे नाव संभाजीनगर ठेवायचे आहे. त्याची भावना लक्षात घेऊन जर आपण हा निर्णय घेत असू तर मी तर लोकांनी निवडून दिलेला खासदार आहे. मला भावना नाही का? औरंगाबाद शहरात जन्म घेतलेल्या या लोकांना भावना नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.
औरंगजेबाला मानत नाही
औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत आहे म्हणजे औरंगजेबाला मानतो असे नाही. असेही खासदार जलील म्हणाले. औरंगजेब हे राजे होते. त्यांची आम्ही कधीही जयंती-पुण्यतिथी केली आहे का? असेही ते म्हणाले.
औरंगजेबाचा फोटो झळकला
नामांतरविरोधी आंदोलनाला अनेकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. यावेळी एक तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन आंदोलन स्थळी आला. तो फोटो उंचावून त्याने जोरदार घोषणाबाजी केली. तरुणांनी 'जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली. मात्र, आयोजकांनी औरंगजेबाचा फोटो पाहताच त्या तरुणाला आंदोलन स्थळावरून पिटाळून लावले. मात्र, या फोटोची चांगलीच चर्चा रंगली.
प्रशासनाला आवाहन
इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध दर्शवत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. या दरम्यान ते म्हणाले, पोलिसांना आणि प्रशासनाला आमचे आवाहन आहे की, आमचे हे लोकशाही पद्धतीने आणि शांततेत आंदोलन असणार आहे. यापूर्वी देखील आम्ही औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती बनवली होती. त्याच कृती समितीच्या अंर्तगत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ज्या पक्ष आणि संघटनांना आमच्यासोबत यायचे आहे. त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला तसे कळवावे. 4 मार्च पासून या उपोषणाला सुरुवात होणार असून, ते किती दिवस चालेल याबाबत सांगता येणार नसल्याचे जलील म्हणाले.
संबंधित वृत्त
शहराचे नामांतर म्हणजे डिक्टेटरशिप:भावनिक मुद्द्यावर 30 वर्षे राजकारण केले, आता कोणता मुद्दा घेणार; माझ्यासाठी औरंगाबादच - इम्तियाज जलील
या आंदोलनाचे स्वरुप, त्यामागचे नेमके कारण काय? या आंदोलनाचा खरेच उपयोग होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जाणून घेतली.पहा संपूर्ण मुलाखत
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.