आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेस गंडा:इन्स्टाग्रामवर 13 दिवसांत मैत्री, व्हॉट्सअॅप क्रमांक घेत शिक्षिकेस घातला लाखोचा गंडा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून त्यावर विश्वास ठेवणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले. स्वत:ला विदेशातील डॉ. जॅक्सन विलियम्स असल्याचे सांगून सायबर गुन्हेगाराने शिक्षिकेला लाखोंचा गंडा घातला. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत व्हॉट्सअॅप क्रमांकांची देवाण-घेवाण झाली. त्यानंतर टेडी व चॉकलेट पाठवल्याचे आमिष दाखवून दोन दिवसांत शिक्षिकेला अज्ञातांनी कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगून कर, विदेशी चलनासारखी कारणे देत तब्बल १ लाख ९५ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

श्रद्धा (३६) ऑनलाइन खासगी शिकवणी घेतात. त्या कुटुंबासह चिकलठाणा एमआयडीसीत राहतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या श्रद्धा यांना काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर डॉ. जॅक्सन विलियम्स नावाच्या प्रोफाइलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर जॅक्सनने रोज बोलणे सुरू केले. त्यावर श्रद्धा यांचा विश्वास बसला.

मैत्री वाढल्याने जॅक्सनने त्यांना मी तुमच्या मुलासाठी चॉकलेट, भेटवस्तू व टेडी पाठवत असल्याचे सांगून त्याने पत्ता मागितला. त्यांनी पत्ता दिल्यानंतर काही दिवसांत त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल प्राप्त झाला. या व्यक्तीने दिल्ली विमानतळावरून बोलत असल्याचे सांगून पार्सलवर कस्टम ड्यूटी चार्जेस ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी विश्वास ठेवत फोनपेद्वारे बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर पाठवले.

शिक्षिकेची १५ दिवसांतच फसवणूक जॅक्सनने इन्स्टाग्रामवर १० मे रोजी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर २३ मे रोजी व्हॉट्सअॅप क्रमांक घेतल्यानंतर २५ मे रोजी भेटवस्तू पाठवल्याचे सांगून पैसे उकळणे सुरू केले. मुळात फ्रेंड रिक्वेस्ट सायबर गुन्हेगाराची होती. परंतु, त्याने स्वत:ला विदेशातील डॉक्टर असल्याचे सांगितले. श्रद्धा उच्चशिक्षित असून अमेरिका, इंग्लंडच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन गणित, कॉम्प्युटर कोडिंगचा शिक्षण देतात. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला होता. मात्र,या प्रोफाइलधारकाने १५ दिवसांत फसवणूक केली.

विविध चार कारणे सांगून उकळले पैसे
विमानतळावरून कस्टम ड्यूटीसाठी पैसे उकळल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी कॉल प्राप्त झाला. २५,००० पाउंड वाचवायचे असतील तर २५ हजार भरण्यास सांगितले. अशी विविध चार कारणे सांगून सायबर गुन्हेगाराने १ लाख ९५ हजार रुपये उकळले व श्रद्धा ते देत गेल्या. अखेर, चौथ्या दिवशी पुन्हा अज्ञाताने आणखी ३ लाख ५० हजारांची मागणी केल्यावर मात्र त्यांचे डोळे उघडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी २० जून रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक विठ्ठल पोटे तपास करत आहेत.