आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठवाड्यात गतवर्षी मान्सून व परतीचा पाऊस जोरदार बरसला होता. जलसंचय एका दशकानंतर ९४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. गत चार महिन्यांत कृषी, उद्योग, व्यवसाय, पिण्यासाठी आणि बाष्पीभवनावर ३२ टक्के पाणी खर्च झाले. त्यामुळे ६२ टक्केच जलसाठा शिल्लक उरला असून दररोज तो खालावत चालला आहे. लघु प्रकल्प व बंधाऱ्यातील जलसंचय ३१ ते ४८ टक्केच शिल्लक राहिलेला आहे.
मराठवाड्यात २०१० मध्ये सरासरीइतके पर्जन्यमान झाले होते. ५८३ प्रकल्पांत ९१ टक्के जलसंचय झाला होता. त्यानंतर सतत हवामानातील बदल, दुष्काळाने होरपळून काढले. एका दशकानंतर २०२० चा मान्सून चांगला बरसला. परतीच्या पावसाने तर दाणादाण उडवली.
सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पर्जन्यमान झाले होते. ऑक्टोबरपर्यंत लहान-मोठ्या एकूण ८७६ प्रकल्पांतील जलसंचय ९४ टक्के झाल्याची नोंद गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाने घेतली होती. मोठे प्रकल्प ते विहिरी, नदी, नाले, बंधारे तुडुंब भरले होते. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने दुष्काळग्रस्त मराठवाड्यात औरंगाबाद कृषी विभागात १३६ टक्के आणि लातूर कृषी विभागात १३१ टक्के राज्यात सर्वाधिक रब्बी पेरणी होण्याचा विक्रम झाला आहे. उद्योग-व्यवसायाला चालना मिळाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निवळला होता. गत चार महिन्यांत कृषी, उद्योग, व्यवसाय, पिण्यासाठी ३२ टक्के पाणी खर्च झाले आहे. त्यात दररोज घसरण होत आहे.
लहान प्रकल्प, बंधाऱ्यांतील साठा अत्यल्प; ४ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा
११ मोठे प्रकल्प : ७३.३२ टक्के जलसाठा. त्यापैकी एका प्रकल्पात २५ टक्के, ६ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के आणि ४ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
७५ मध्यम प्रकल्प : ५५.३२ टक्के जलसाठा असून १ प्रकल्प जोत्याखाली, ७ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ४४ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत आणि केवळ ७ प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर पाणी शिल्लक आहे.
गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत : ४८.६० आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांतील जलसाठा ३१ टक्केच शिल्लक उरला आहे. एकूण ६२.५९ टक्के साठा आहे. लहान प्रकल्प, बंधाऱ्यांतील साठा अत्यल्प शिल्लक उरला आहे. त्यामुळे यावर निर्भर गावांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.
दिव्य मराठी लक्षवेधी
७५२ लघु प्रकल्पांत : ३८.११ टक्क्यांवर जलसाठा गेला आहे. यात ९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. ६४ जोत्याखाली गेले आहेत. १४१ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ३०७ प्रकल्प ५० टक्क्यांपर्यंत आणि २०० प्रकल्प ५० ते ७५ आणि ३१ प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर जलसाठा शिल्लक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.