आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे रीडिंग स्वत: घेऊन महावितरणला पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाइल अॅप, वेबसाइट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठवले आहे. यामध्ये औरंगाबाद परिमंडळातील १० हजार वीजग्राहकांचा समावेश आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात १ लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठवले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज जोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे.
ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवस आधी रीडिंग पाठवण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल अॅप, www.mahadiscom.in किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्ल्यूएच (kWh) रीडिंग पाठवता येते. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवलेले आहे.
असे पाठवा रीडिंग
महावितरण मोबाइल अॅपमध्ये ‘सबमिट मीटर रीडिंग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्ल्यूएच (kWh) रीडिंगचा (केडब्ल्यू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमिट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉग-इन करून www.mahadiscom.in वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्यासाठी MREAD
<12 अंकी ग्राहक क्रमांक>
असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठवल्यास मीटर रीडिंग सबमिट करता येईल.
अनेक फायदे
वीजग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठवल्यास मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीज वापरावरही नियंत्रण राहील. रीडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीज बिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंकासमाधानासाठी तक्रार करता येईल. रीडिंग पाठवण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.