आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शहराच्या सहा प्रवेशद्वारांवर उद्यापासून अँटिजन चाचण्या; स्क्रीनिंगमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांचीच कोरोना चाचणी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निगेटिव्ह आढळलेल्या नागरिकांनाचा प्रवेश देणार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मनपाने शहरातील सहा एन्ट्री पॉइंटवर पुन्हा अँटीजन चाचण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (२० मार्च) पथकांमार्फत प्रवाशांची तपासणी केली जाईल. स्क्रीनिंगमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांची अ‍ँटिजन चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. गतवर्षी शहरात कोरोना संसर्ग पसरल्यानंतर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची सहा एन्ट्री पॉइंटवर तपासणी केली जात होती. यात हजारो प्रवासी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे शहरात होणारा संसर्ग कमी झाला. आता पुन्हा एन्ट्री पॉइंटवर चाचण्या सुरू करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.

शहरात येणारी वाहने थांबवून प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल. त्यात ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील त्यांच्या चाचण्या करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले जाईल, तर ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल.

कोरोना नियंत्रणासाठी मनपाला हवेत अाणखी ५५ काेटी रुपये
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या नियंत्रणासाठी मनपाला अाणखी ५५ काेटी रुपये खर्च अपेक्षित अाहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात अाला अाहे. या पैशातून कोरोना चाचण्या, कोरोनाबाधितांवर उपचार, त्यांच्या जेवणाची सोय, कोविड केअर सेंटरमधील सुविधा अादींवर खर्च करण्यात येणार अाहे. मागील महिन्यात शहरात केवळ दोन कोविड केअर सेंटर सुरू होते. आता ही संख्या १२ च्या पुढे गेली आहे. नवीन कोविड केअर सेंटरसाठी गाद्या, पलंग, उशा, लाइट, पंखे अशी व्यवस्था करावी लागते. तसेच रुग्णांना जेवण, नाष्टा, चहा, औषधींसाठीही खर्च हाेताे. नव्याने नियुक्त केलेले कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांच्या वेतनावरही खर्च हाेताे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला ५५ कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरुवारी दिली.

गतवर्षी मिळाले ३७ कोटी
गतवर्षी या आरोग्यसेवेसाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा खर्च झाला. शासनाकडून मनपाला आजवर ३७.३६ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियाेजन समिती व अापत्ती व्यवस्थापनातून मिळाला आहे, तर उर्वरित रक्कम निधी लवकरच मिळेल. त्यानंतरी कंत्राटदारांची उर्वरित देणी दिली जातील, असेही मनपाकडून सांगण्यात अाले.

१९ वॉर्ड ठरले हॉटस्पॉट
कोरोनाचे अधिक रुग्ण आढळलेले १९ वॉर्ड हॉटस्पॉट ठरले आहेत. या ठिकाणी जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी पथके तयार केली आहेत. हीच पथके लसीकरणासाठीदेखील मदत करणार आहेत, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

या पॉइंटवर तपासणी पथके
हर्सूल-सावंगी येथील टोल नाका, नगर नाका, दौलताबाद टी पॉइंट, चिकलठाणा येथील केंब्रिज शाळा चौक, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथके नियुक्त केली जाणार आहेत.

कोचिंग क्लासेसच्या संचालकावर गुन्हा
कोरोनाचे नियम डावलून कोचिंग क्लासेस सुरू ठेवणाऱ्या दोन क्लासेसच्या संचालकांवर १८ मार्च रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरालगत कृष्णाई कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सकाळी ६.३० वाजता मोरया क्लासेसचे संचालक अमोल मोरे तसेच किरण जाधव (दोघे. रा.बजाजनगर) हे क्लासेस घेत हाेते. त्यामुळे या दाेघांविराेधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आठ महिन्यांपासून रिकाम्या खोलीचे भाडे देत आहे. बंद खोलीत नव्हे तर मोकळ्या टेरेसवर सुरक्षित अंतर ठेवून मी फक्त स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतो. हेतुपूर्वक काही लोक माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे माेरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...