आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनोच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना साेमवारपासून (३ जानेवारी) १५ ते १८ वयाेगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होत आहे. मात्र दुसरीकडे अजूनही १८ वर्षांवरील अनेक लाेकांना लसीकरणाचे महत्त्व पटलेले नाही. त्यामुळेच नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झालेली दिसते. १ डिसेंबरपर्यंत राेज ३६ हजार लाेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतले. पण नंतर ओमायक्राॅनचे संकट वाढत असताना मात्र ही संख्या आठ हजारांपर्यंत घटली. विशेष म्हणजे दुसऱ्या डोसची मुदत उलटून गेल्यानंतरही सुमारे साडेतीन लाख लोक अजून केंद्राकडे फिरकण्यास तयार नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार ३९० जणांचा पहिला तर १२ लाख ६६ हजार ७३५ लोकांचा दुसरा डोस शिल्लक आहे. या सज्ञान लाेकांच्या तुलनेत किशाेरवयीन मुला-मुलींमध्ये मात्र लस घेण्याबाबत उत्सुकता दिसून येते.
प्रशासनाने ‘नाे व्हॅक्सिन, नाे रेशन, नाे वेतन’ यासारखे अनेक निर्बंध लागू केल्यामुळे नाेव्हेंबरमध्ये लसीकरणाची गती वाढली हाेती. १५ नाेव्हेंबर राेजी जिल्ह्यात ३५ हजार ९९९ लाेकांनी लस घेतली हाेती. डिसेंबरच्या सुरुवातीपासून मात्र हा आेघ कमी हाेत गेला हाेता. १ डिसेंबर रोजी शहरात १०,३३६ आणि ग्रामीण भागात २५,८५९ असे ३६ हजार १९५ जणांचे लसीकरण झाले. ७ डिसेंबर रोजी शहरात ५०५ तर ग्रामीण भागात १६,६६६ असे २१,७२० लसीकरण झाले. २० डिसेंबर रोजी शहरात ३,५०१ आणि ग्रामीण भागात ८,७१३ असे १२,२१४ लसीकरण झाले. २९ डिसेंबर रोजी हे प्रमाण आणखी घटून शहरात २७६९ तर ग्रामीण भागात ६,७०६ असे ९,४७५ लसीकरण झाले. एक जानेवारी रोजी शहरात केवळ २,९१७ तर ग्रामीण भागात ५,१५६ असे ८०७३ इतकेच लसीकरण झाले.
धाेका ओळखून लस घेण्यास पुढे यावे : जिल्ह्यात काेव्हॅक्सिन आणि कोविशील्डचा पहिला डाेस घेतलेले व दुसऱ्या डाेसची मुदत उलटून गेलेले साडेतीन लाख लाेक अजून लस घेण्यास आलेले नाहीत. प्रशासनाच्या वतीने त्यांना सातत्याने संपर्क केला जात आहे मात्र त्यांना त्याचे गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढत नाही. ओमायक्राॅनचा धाेका ओळखून तरी या लाेकांनी लस घेण्यास पुढे यावे, असे आवाहन जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. महेश लड्डा यांनी केले.
शहरातील चार केंद्रांवर मुला-मुलींचे लसीकरण
१५ ते १८ वयोगटातील जिल्ह्यातील २ लाख १३ हजार ८२३ मुला- मुलींना साेमवारपासून काेव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. औरंगाबादेत ही संख्या ६९ हजार ९९८ आहे. शहरातील मेल्ट्रान रुग्णालय, क्रांती चौक आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटलमध्ये तर ग्रामीण भागात दहा केंद्रांवर त्यांचे लसीकरण केले जाईल. ६० वर्षांवरील व्याधी असलेल्या वयोवृद्धांना व फ्रंटलाइन वर्कर्सना १० जानेवारीपासून तिसरा डाेस देण्यात येणार आहे. मात्र दुसरा डाेस हाेऊन ९० दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांनाच तिसरा डाेस मिळणार आहे.
‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ची साेय, दोन वाहनांचे आज लोकार्पण
ग्रामीण भागातील १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना गावागावात जाऊन लस देण्यासाठी ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी मिळालेल्या दोन वाहनांचे लोकार्पण सोमवारी (३ जानेवारी) वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही दोन्ही वाहने पैठण आणि वैजापूर तालुक्यात फिरतील. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या गावांमध्ये, वाडी-वस्ती, तांड्यावर जाऊन या लस देण्यात येईल. या वाहनामध्ये एक डॉक्टर, २ नर्स आणि १ समुपदेशक उपलब्ध असतील. महिनाभरापूर्वी खुलताबाद तालुक्यातही असे एक वाहन मिळाले आहे. इतर तालुक्यांसाठी आणखी दोन वाहने मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.