आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांचे विनंतीवजा आवाहन:तुमच्या रुग्णाला सौम्य लक्षणे असल्याने घाटीत ठेवण्याचा हट्ट नको; मनपाच्या ‘सीसीसी’मध्ये न्या, गंभीर रुग्णांना खाटा देऊन जीव वाचवा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटीत २०० रुग्ण सौम्य लक्षणांचे, पैकी दिवसभरात सहा जणांनाच हलवले, तीन जणांना डिस्चार्ज

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वच सरकारी व खासगी रुग्णालये फुल्ल हाेत अाहेत. त्यातच गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून त्यांना घाटीत अाॅक्सिजन, व्हेंटिलेटरची साेय असलेले बेड मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर येथील डाॅक्टरांनी साैम्य लक्षणे असलेल्या व अाॅक्सिजनची गरज नसलेल्या २०० रुग्णांना मनपाच्या काेविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) हलवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी साेमवारी रुग्णांच्या नातलगांचे समुपदेशन करण्यात अाले.

‘तुमच्या रुग्णांना फारसा त्रास नाही, त्यांना अाॅक्सिजनचीही गरज नाही. ‘सीसीसी’मध्येही चांगले उपचार हाेऊ शकतात, त्यामुळे त्यांना तिकडे हलवा व दुसऱ्या गंभीर रुग्णांसाठी बेड रिकामे करून द्या, जेणेकरून इतरांचेही जीव वाचतील,’ असे विनंतीवजा अावाहन डाॅक्टर करत अाहेत. मात्र काहींचा अपवाद वगळता बहुतांश रुग्णांचे नातलग घाटीतून हलण्यास तयार नाहीत. साेमवारी दिवसभरात फक्त सहा जणांचेच मन वळवण्यात डाॅक्टरांना यश अाले. त्यांना यशवंत हाेस्टेलच्या सीसीसीमध्ये हलवण्यात अाले. तिघांनी डिस्चार्ज घेऊन घरी जाणे पसंत केले.

साेमवारी घाटीतल्या ग्रंंथालयात डॉ. अश्फाक सय्यद, डाॅ. प्रिया वट्टमवार, डॉ. महंमद लईक व समाजसेवा अधीक्षक नरेंद्र भालेराव हे काेविड रुग्णांच्या नातलगांशी संवाद साधत हाेते. काही रुग्णांच्या शरीरातील अाॅक्सिजन झपाट्याने कमी हाेत अाहे. अशा गंभीर रुग्णांसाठी घाटीतच चांगल्या सुविधा अाहेत. मात्र सध्या सर्व खाटांवर रुग्ण असल्याने गंभीर रुग्णांना दाखल करून घेता येत नाही. कृपया, तुमच्या रुग्णांना अगदीच साैम्य लक्षणे अाहेत. त्यामुळे त्यांची अापण मनपाच्या काेविड सेंटरमध्ये व्यवस्था करू. जेणेकरून इथले बेड रिकामे हाेतील व गंभीर अवस्थेतील रुग्णांना दाखल करुन घेता येईल, त्यांचे प्राण वाचवता येतील,’ असे ते समजावून सांगत हाेते.

काेविड सेंटरमध्ये नको, आम्हाला घरीच पाठवा : बहुतांश रुग्णांचे नातलग घाटीसारखेच चांगले उपचार सीसीसीमध्ये मिळतील का, याबाबत शंका करून तिकडे जाण्यास तयार नव्हते. ‘अाम्हाला उपचार घेऊन सात-अाठ दिवस झाले अाहेत. जर अामच्या रुग्णांची प्रकृती चांगली अाहे तर सीसीसीमध्ये कशाला पाठवता? डिस्चार्ज देऊन घरीच पाठवा’ अशी मागणी काहींनी केली. त्यांची तपासणी करून तिघांना पुढील उपचारांच्या गाेळ्या देऊन डिस्चार्ज देण्यात अाला, अशी माहिती घाटीतील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. घरी क्वाॅरंटाइन राहण्यास घाटीतील डाॅक्टरांनी सांगितले अाहे.

शिफारशीवाल्यांकडून दबाव
घाटीत बहुतांश वेळा बेड फुल्लच असतात. अशा वेळी एखादा राजकीय नेता, पदाधिकारी, सामाजिक संघटना, डाॅक्टरांच्या शिफारशीने तिथे रुग्णाला कसाबसा बेड उपलब्ध हाेताे. एकदा बेड मिळाला की उपचार पूर्ण हाेईपर्यंत हे रुग्ण दुसरीकडे स्थलांतरित हाेण्यास तयार नसतात. डाॅक्टरांनी फारच अाग्रह केला तर ज्यांच्याकडून शिफारस अाणली त्यांच्याकडून प्रसंगी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला जाताे. त्यामुळे या रुग्णांना सीसीसीमध्ये स्थलांतरित करण्यास घाटीतील डाॅक्टरांना अडचणी येत अाहेत.

कुणाचा जीव वाचत असेल तर अाम्ही स्थलांतरास तयार
घाटीत रुग्णांची वाढत अाहेच. माझ्या पत्नीला सध्या कसलाही त्रास नाही. आम्हाला सीसीसीमध्येही असेच औषधोपचार मिळणार असतील तर अाम्ही तिकडे जाण्यास तयार अाहाेत. आमच्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला बेड मिळत असेल, त्याचा जीव वाचत असेल तर अाम्हाला अानंदच अाहे. - सुरेश दाभाडे, रुग्णाचे पती

घाटीवर विश्वास असल्याने इतरत्र जाण्यास नकार
कोरोनामुळे रुग्णांच्या नातेवाइकांत भीतीचे वातावरण असते. मात्र घाटीत चांगले उपचार मिळत असल्यामुळे त्यांना येथील डाॅक्टर-कर्मचाऱ्यांवर विश्वास निर्माण झालेला असताे. त्यामुळे सुुरुवातीला ते स्थलांतरास तयार हाेणार नाहीत. मात्र अाम्ही वारंवार समजावून सांगणार अाहाेत. अाज ना उद्या अनेक रुग्ण सीसीसीमध्ये जाण्यास तयार हाेतील. - डाॅ. अश्फाक सय्यद, अध्यक्ष समुपदेशन

बातम्या आणखी आहेत...