आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:‘कोरोनामुक्त’झालेल्या तीस वर्षीय रुग्णाचा डिस्जार्चनंतर ४ तासांत मृत्यू; मनपा म्हणते : प्रकृती ठीक म्हणूनच सोडले, घाटी म्हणते : कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टमॉर्टेम आरोग्य यंत्रणेचे बाधितांची संख्या वाढल्याने कोलमडली यंत्रणा; कुठे निष्काळजीपणा उघड, तर कुठे सुविधांचा अभाव

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपाने कुठलाही त्रास हाेत नसलेल्या रुग्णास दहाएेवजी अाठ दिवसांतच डिस्चार्ज देण्याचा निर्णय अाता घेतला अाहे. अशाच एका रुग्णाला काेराेनामुक्त झाल्याचे सांगून शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात अाला. मात्र घरी अाल्यावर तासाभरात बेशुद्ध पडलेल्या या रुग्णाची चारच तासांत प्राणज्याेत मालवली. काेराेनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे घाटीने म्हटले अाहे.

अमोल लोहार (३०) असे मृताचे नाव असून ताे हडको एन-१३ डी सेक्टरमध्ये राहत हाेता. ताे एका माेबाइल कंपनीच्या कार्यालयात कार्यरत हाेता. काेराेनाची लागण झाल्याने १२ मार्च राेजी त्याला शासकीय पॉलिटेक्निक येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले हाेते. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्याला सुटी देण्यात अाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ते घरी पाेहाेचले. दहा मिनिटे झाल्यानंतर अमाेल फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. काही क्षणातच धाडकन अावाज अाला. पत्नीने धाव घेतली, मात्र दरवाजा अातून बंद हाेता. प्रतिसाद मिळत नसल्याने तिने अमाेलच्या भावाला बाेलावले. त्यांनी दरवाजा तोडला असता अमाेल बेशुद्धावस्थेत खाली कोसळलेला हाेता. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात अाले, मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.

असा घडला घटनाक्रम
-शुक्रवारी सकाळी ११ वाजता डिस्चार्ज
- दुपारी १२ वाजता घरी गेला. बाथरूममध्ये फ्रेश हाेण्यासाठी गेला, मात्र बाहेर अाला नाही
-कुटुंबीयांनी दरवाजा तोडून काढले बाहेर.
-दुपारी दीड वाजता एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने घाटीत पाठवले
- दुपारी दाेन वाजता घाटीत दाखल
- दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास डाॅक्टरांनी मृत घाेषित केले

क्ताची गाठ झाली असावी
सकाळी अमाेलसह रुग्णांची तपासणी केली हाेती. त्याची ऑक्सिजन लेव्हल ९८ होती. सर्व चाचण्या ठीक असल्याने, प्रकृती उत्तम असल्यानेच त्याला डिस्चार्ज दिला. गुरुवारी त्याने मित्रांसोबत गप्पा केल्या. चिंचाही तोडल्या. त्यांना इतर काही आजार नव्हता. मात्र हृदयाच्या धमन्यांत रक्ताची गाठ झाल्याने असा प्रकार घडू शकतो. - डॉ. स्मिता नळगीकर, नोडल अधिकारी

घरची परिस्थिती बिकट
अमोल यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे. मोठा भाऊ रिक्षा चालवतो. अमाेलच्या पश्चात अाई-वडील, पत्नी, सात वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याची भावना त्याच्या भावाने व्यक्त केली. अमाेलला काेराेना झाल्यामुळे त्याचे आई-वडील नातेवाइकांकडे गेले होते. घाटीत जाण्याची केली होती सूचना डिस्चार्ज देताना काही कर्मचाऱ्यांनी अमोलला घाटीत पुन्हा जाऊन तपासणीचा सल्ला दिला हाेता, असे भाऊ अजयने सांगितले. रुग्णसंख्या वाढत असल्याने दुसऱ्यांना बेड उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली मनपाचे डाॅक्टर रुग्ण बरा झाल्याची खातरजमा न करताच डिस्चार्ज देत अाहेत. त्यामुळेच अमाेलचे निधन झाले. त्याच्या मृत्यूस मनपाच जबाबदार अाहे, असा अाराेप अजय व त्यांच्या नातलगांनी केला.

...हा तर मनपाच्या कारभाराचा बळी
सकाळी डिस्चार्ज मिळालेल्या मुलाची तब्येत खालावल्याची माहिती वाॅर्डातील नागरिकांनी दिली. ऑक्सिजन स्तर खूपच खालावल्याने अमाेलचा मृत्यू झाल्याचे घाटीत डॉक्टरांनी सांगितले. मनपाने केवळ रुग्ण वाढत असल्याने शहानिशा न करता रुग्णांना डिस्चार्ज करण्याचा धडाका सुरू केला आहे. मनपाच्या गलथान कारभाराचा हा बळी अाहे. - राजगौरव वानखेडे, माजी नगरसेवक

घाटीमध्ये एकाच बेडवर दाेन रुग्ण; काही वेळानंतर वाढवले १०२ बेड
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेड वाढवा, अशी सूचना गेल्या आठ दिवसांपासून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर घाटी रुग्णालयाला करत होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परंतु त्यामुळे घाटीत एकाच बेडवर दोन-तीन रुग्णांना ठेवण्याची वेळ अाली हाेती. हे फोटो शुक्रवारी ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले. दरम्यान, दुपारनंतर १०२ बेड वाढवण्याचा निर्णय झाला. तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांवर नेफ्रॉलॉजी विभागात उपचार केले जाणार आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट म्हणजे शोध, तपासणी, उपचार अशी त्रिसूत्री वापरण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

घाटीच्या कोरोना वॉर्डात रुग्णांची संख्या वाढत असून एकाच बेडवर दोन-तीन रुग्णांना ठेवून ऑक्सिजन लावले जात असल्याची काही छायाचित्रे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली. ते कळताच यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. काही वेळाने बेडची संख्या ५२८ वरून ६३० केल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’ने या फोटोंबद्दल विचारणा केली असती मला काहीही माहिती नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, कोरोनासंदर्भात पालकमंत्री देसाई यांनी ऑनलाइन आढावा बैठक घेतली. कोविड केअर सेंटरसह सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेडची तयारी ठेवा, घाटीतील गंभीर रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष खबरदारी घ्या, ऑक्सिजन- औषधींच्या साठ्याकडे लक्ष ठेवा, प्रत्येकाला व्यवस्थित उपचार मिळण्यासाठी समन्वयाने काम करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच उपचाराची सोय
ग्रामीण भागात लक्षणे नसलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवत आहोत. जिल्ह्यात ११५ ठिकाणी उपचार उपलब्ध असून ११,७६३ आयसोलेशन बेड, २१२४ ओटू बेड, ५३२ आयसीयू बेड, ३०० व्हेंटिलेटर आहेत. औरंगाबादेत ३३ ठिकाणी लसीकरणाची सोय आहे. मोबाइल व्हॅनद्वारेही लसीकरणाची यंत्रणा तयार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे सीईअाे डॉ. मंगेश गोंदावले यांनी ग्रामीण भागात ८ हजार बेड, एक हजारांपर्यंत चाचण्यांचे नियोजन केल्याची, तर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तालुका नाकेबंदी सुरू असल्याची माहिती दिली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर बैठकीला उपस्थित हाेते.

मनपाकडे ऑक्सिजनची नोंद ९८, एम्समध्ये ८० पेक्षा कमी
‘दिव्य मराठी’ने अधिक माहिती घेतली असता डिस्चार्ज मिळण्यापूर्वी मनपाच्या काेविड सेंटरमध्ये अमाेलची सकाळी तपासणी केली असता त्याची ऑक्सिजन लेव्हल ९८ असल्याची नोेंद आहे, तर दुसरीकडे डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन तासांत प्रकृती खालावल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे त्याची ऑक्सिजन लेव्हल ८० पेक्षा कमी असल्याची नाेंद अाहे.

दाेन्ही सरकारी रुग्णालयातील अहवालात परस्परविराेधी नाेंदी
मनपाने डिस्चार्ज देताना अमाेल बरा झाला असून त्याची सर्व तपासणी लेव्हल चांगली असल्याचे डिस्चार्ज अहवालात नमूद आहे. तर घाटीने मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने अमाेलचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र दिले. हे प्रमाणपत्रही ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...