आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात पशुवैद्यकीय पथके तैनात:जळगाव, धुळे, नगर येथील जनावरांना लंपी आजाराचा विळखा, पशुसंवर्धन विभाग सतर्क

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव, धुळे व नगर येथे जनावरांना होणारा लंपी या आजाराने विळखा घातला आहे. या जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या सोयगाव, सिल्लोड, कन्नड तालुक्यांना लंपी स्कीन डिसीजचा जास्त धोका असल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. फर्दापूर गावात आजार सदृश जनावरे आढळल्याने जिल्ह्यात पशुवैद्यकीय पथके तैनात करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून लंपी स्कीन आजाराचा नायनाट करण्यात आला होता. परंतु जळगाव नगर, धुळे या जिल्ह्यात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव, सिल्लोड या तालुक्यात संशयित जनावरे आढळून आली आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागातर्फे पथके तयार करण्यात आली असून संशयित जनावरे आढळलेल्या पाच किलोमीटर अंतरावर औषधाची फवारणी करण्यात आली आहे.

लसीकरण करून घ्यावे

संशयित जनावरांचा अहवाल पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून चार दिवसात याचा अहवाल येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सतर्क राहून या आजाराचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन औरंगाबाद जि.प. पशुसंवर्धन विभागाच्यातर्फे करण्यात आले आहे.

जंत नाशकाची गोठ्यात फवारणी

जिल्ह्यात आतापर्यंत लंपी स्कीन डिसीज आजाराचे जनावरे आढळले नसले तरी काही जनावरांना या आजाराची लक्षणे दिसून आली आहे. दरम्यान जिल्हात पशुवैद्यकीय पथके नेमून सोडियम हायपोक्लोराइट, जंत नाशकाची गोठ्यात फवारणी करण्यात आली आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी सांगितले.

अशी आहेत रोगाची लक्षणे

जनावरांच्या त्वचेवर गाठी, डोळे, मान, पाय, कासेच्या भागात 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज येणे, जनावरे लंगडणे, डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे तर जनावरांना आठवडाभर तापही येतो.

अशी घ्या काळजी

या आजारावर नियंत्रणासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. हवेशीर वातावरण ठेवावे, गोठा परिसरात पाणी, डबके, साठणार नाही याची काळजी घ्यावी,बाधित जनावरांना वेगळे करावे, बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये, जनावरांच्या संपर्कात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे.

बातम्या आणखी आहेत...