आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:कोरोनाच्या 2 वर्षांत राज्यातील 47% विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित

औरंगाबाद | डॉ. शेखर मगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला गेला. पण महाराष्ट्रातील तब्बल ४७% विद्यार्थ्यांकडे मोबाइल, टॅबसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणेच नव्हती. ५३% विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले. उपकरणे असलेल्यांपैकी ३९% मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यात खूप अडचणी आल्या होत्या. कोरोनाकाळात ६५% विद्यार्थ्यांना अस्वस्थता आणि भीतीने ग्रासले होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मे २०२२ दरम्यान जारी केलेल्या (नॅस) नॅशनल अचीव्हमेंट सर्व्हे २०२१ मध्ये हे निष्कर्ष मांडले आहेत. देशातील २४% पालकांकडे कुठलेच उपकरण नव्हते. त्यामुळे त्यांचे पाल्यही शिक्षणापासून वंचित राहिल्याचे अहवालात नमूद आहे.

विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता ओळखणे व शालेय शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी गॅप शोधण्याच्या हेतूने २००१ पासून ‘नॅस’चा सर्व्हे सुरू आहे. २०१७ त्यानंतर २०२० मध्ये सर्वेक्षण करणे अभिप्रेत होते. मात्र कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे ते होऊ शकले नव्हते. नोव्हेंबर २०२१ दरम्यान शाळा सुरू झाल्यावर देशपातळीवर सर्वेक्षण केले होते. इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकडून २२ भाषांत सर्वेक्षण फॉर्म भरून घेतले. केंद्राने त्याचा अहवाल २७ मे २०२२ रोजी जारी केला. सर्वेक्षणाच्या निष्कर्षाने देशासह महाराष्ट्रातील शैक्षणिक स्थितीचे दर्शन घडवले आहे.

देशातील स्थिती अशी
78% विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हे ‘बर्डन’ म्हणजेच ओझे वाटत होते.
24% मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर आदी उपकरणेच नव्हती. त्यामुळे ते ऑनलाइन शिक्षणापासून कोसो दूर राहिले आहेत.
38% विद्यार्थ्यांनी अडथळ्यांचा सामना करत शिक्षण घेतले
45% विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेतले.
47% गरीब विद्यार्थ्यांकडे कुठल्याच प्रकारचे डिजिटल डिव्हाइसच उपलब्ध नव्हते.

महाराष्ट्रातील स्थिती अशी
53% विद्यार्थ्यांनी राज्यात ऑनलाइन शिक्षण घेतले..
39% विद्यार्थ्यांना अनेक अडथळे आले. त्यामध्ये इंटरनेट स्पीड कमी असणे, डेटा पॅक संपणे, विद्युत पुरवठा खंडित होणे आदी समस्या आहेत.
47% गरीब विद्यार्थ्यांकडे कुठल्याच प्रकारचे डिजिटल डिव्हाइसच उपलब्ध नव्हते.

राज्यातील ५२ टक्के शाळांमध्ये ग्रंथालय नाही
४८% शाळांमध्ये ग्रंथालय आहे. ५२% शाळा अद्यापही विद्यार्थ्यांना ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात असमर्थ.
अर्हताप्राप्त शिक्षकांचा समावेश असलेल्या ९१% शाळा असून फक्त ६५% शाळांत सपोर्टिव्ह स्टाफ आहे.

सात टक्के लाेकांच्या मते शाळेत शौचालयाचा अभाव आहे.
३३% शिक्षकांना कामाचा ताण आहे. ९०% पालक शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात.
५९% शाळेत ऑडिओ-व्हिज्युल्स क्लासरूम आहेत. १२% शिक्षकांनी शाळा इमारत दुरुस्तीची गरज व्यक्त केली.

६५% विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाची भीती
कोरोनाकाळात भीती आणि मनाची अस्वस्थता होती असे ६५% विद्यार्थी म्हणाले. ८९% विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या निर्बंधांचे पालन केले. शिक्षक शिकवतात ते समजते असे ९८ टक्के विद्यार्थ्यांचे मत आहे. ऑनलाइनऐवजी थेट शाळेत जाण्यास आवडते, असे ९८ टक्के विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

असा झाला सर्व्हे

-देशपातळीवरील सहभागी : ३४ लाख विद्यार्थी, १.१८ लाख शाळा, ७२० जिल्हे -महाराष्ट्रातील सहभाग : ७२२६ शाळा, ३०५६६ शिक्षक, २,१६,११७ विद्यार्थी

-विद्यार्थी ५९.९%, विद्यार्थिनी ४९.१%, ग्रामीण भाग ५६%, शहरी भाग ४४%

-सामाजिक स्थिती : एससी १३%, एसटी १२%, ओबीसी ३८%, सर्वसाधारण ३६% -राज्य सरकारी शाळा २७%, अनुदानित ३३%, खासगी ३२%, तर केंद्रीय ८%.

बातम्या आणखी आहेत...