आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात बहुतांश ठिकाणी गुंड, मवाली, टवाळखोरांच्या टोळ्या रोजच धुडगूस घालत आहेत. फाजलपुऱ्यात रस्त्यावर दारू पिण्याला विरोध केला म्हणून तुफान दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजता घडली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली. एक आरोपी अल्पवयीन आहे. लेबर कॉलनीतील फाजलपुऱ्यात सय्यद बासीत सय्यद हसन (४२) यांचे किराणा दुकान आहे. ते ३ जून रोजी रात्री ९.३० वाजता दुकान बंद करून घरी पोहोचताच त्यांना परिसरात मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी धाव घेतली. मात्र, गल्लीत मोठा राडा सुरू झालेला पाहून ते घाबरून गेले. काय झाले कळायच्या आत दगडफेक सुरू झाली. महिला, लहान मुले सैरभैर पळत होती. एक गट हातात लाठ्याकाठ्या घेऊन मारण्याच्या उद्देशाने फिरत होता. यातून सावरत ते पुढे गेले तेव्हा त्यांचा भाऊ सय्यद खलील हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. भावाच्या मदतीसाठी गेलेल्या बासीत यांना एका गटाने मारहाण केली. स्थानिकांनी हा प्रकार तत्काळ सिटी चौक पोलिसांना कळवला. पोलिसांनी फौजफाट्यासह धाव घेत जमाव पांगवला.
जखमी सय्यद खलील यांना प्राथमिक उपचार करून ठाण्यात नेले तेव्हा ते म्हणाले, रात्री ९.३० वाजता घरासमोर उभ्या रिक्षात (एमएच २० एए १०५२) अक्षय हिवाळे, हरीश ऊर्फ नक्का मारुती साळुंके, राजू हिवाळे, अरबाज हे दारू पीत होते. त्यांनी आराेपींना येथे दारू पिऊ नका, असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी मारहाण सुरू केली. तेवढ्यावर न थांबता त्यांनी आणखी पंधरा ते वीस जणांना बोलावून घेतले. त्यानंतर दोन्हीकडून तरुण जमा झाले व एकमेकांवर हल्ला चढवला. टवाळखोरांनी एक दुचाकी व रिक्षाची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.