आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याची स्थिती:15 दिवसांत पावसाने दिली ओढ; पण चारच दिवसांत पिकांना संजीवनी

संतोष देशमुख | औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात १ ते ४ सप्टेंबरदरम्यान १६.६ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत २१.५ मिमी म्हणजे १२९.५ टक्के पर्जन्यमान झाले आहे. हवामान बदलामुळे जेथे पोषक वातावरण तयार होते तेथेच पाऊस पडतो आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यांत २०२, जालना २२५ आणि उस्मानाबादेत २०७.४ टक्के, तर नांदेडमध्ये केवळ १४.३, परभणी ३८.५ आणि हिंगोली ६४ टक्केच पाऊस पडला. येथे ८५.७ ते ३६ टक्के पावसाची तूट राहिली. दरम्यान, चार दिवसांत झालेल्या पावसाने मराठवाड्यातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.

154 टक्क्यांवर पर्जन्यमान

जूनमध्ये सरासरी इतका तर जुलैमध्ये १५४ टक्क्यांवर पर्जन्यमान झाले. ऑगस्टमध्ये पावसाचा पंधरा दिवसांचा मोठा खंड पडला होता. ३१ ऑगस्टपासून गणपती बाप्पासोबत पावसाचेही वादळी वारे, मेघगर्जनेसह पुनरागमन झाले आहे. मात्र, जेथे सापेक्ष आर्द्रता १०० टक्के, बाष्पयुक्त ढगांची गर्दी, अनुकूल तापमान आणि कमी हवेचा दाब असतो तेथेच काही वेळेतच धो-धो पाऊस पडत आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टच्या रात्री ते १ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार तालुक्यात ३० ते ४८ मिमी, लातूर ३३, परंडा ३५, औरंगाबादेत १३.५ मिमी पाऊस पडला. २ सप्टेंबर रोजी औरंगाबाद तालुक्यात ४२.९ मिमी, खुलताबाद ३१, भोकरदन तालुक्यात ५५.७, जाफराबाद ३२, लातूर ४३.९ व औसा ३९.९ मिमी, तर नांदेडच्या १६, परभणी ९ व हिंगोली ५ तालुक्यांत पावसाचा केवळ शिडकावा झाला. ४ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत खुलताबादेत ४३.९ मिमी, अहमदपूर ५० मिमी, तर किनवट ३६.५, माहूर तालुक्यात ३१ मिमी सर्वाधिक पाऊस झाला. विशेष म्हणजे वैजापूर तालुक्यातील काही मंडळात गारपिटीची नोंद झाली.

पावसासाठी अनुकूल वातावरण
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तर आपल्याकडे १००६ हेप्टापास्कल दाब असून पूर्वेकडून बाष्प खेचून आपल्याकडे येत आहे. जेथे पोषक वातावरण तेथेच जास्त पाऊस पडतो, तर ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.

पिकांवरील संकट दूर होईल

औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी सांगितले की,​​​​​​​ ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे बहरलेली पिके सुकू लागली होती. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही बिकट स्थिती निर्माण झाली. गत चार दिवसांतील पावसाने पिकांना जीवदान मिळाले. आठ दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...