आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष:पाच वर्षांत दुरुस्तीअभावी 40 बस बिघडल्या ; पुरेशा संख्येने स्मार्ट बस धावत नसल्याने प्रवासी घटले

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला सेवा देणारी स्मार्ट बस नावाला जरी स्मार्ट असली तरी प्रत्यक्षात या बसची दुरुस्ती योग्य होत नसल्यामुळे ४० बस खराब झाल्या आहेत. त्यामुळे या बस प्रवाशांच्या सेवेत नाहीत. विशेष म्हणजे अशा प्रकारची अडचण होऊ नये म्हणून एसटी महामंडळाच्या मेंटेनन्स विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना स्मार्ट बसमध्ये घेण्यात आले होते तरीसुद्धा स्मार्ट बसचे मेंटेनन्स योग्य प्रकारे होत नसल्याचे समोर आले आहे. बसच्या इंजिनमधील दुरुस्ती, ब्रेक, वायरिंग, टायर बदलणे याकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत आहे.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत २०१६ मध्ये शहराचा समावेश झाला. शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने टाटा कंपनीकडून शंभर बसेसची खरेदी करण्यात आली. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सिटी बस चालवण्यासाठी एसटी महामंडळासोबत करार केला, पण त्यांनी मनुष्यबळ पुरवण्यास उशीर केल्यामुळे २०१९ मध्ये सिटी बस सुरू झाली. टप्प्याटप्याने ८० पेक्षा अधिक बसेस रस्त्यावर धावू लागल्या. मात्र, कोरोना संसर्गाची साथ आल्यामुळे सिटी बस बंद ठेवण्यात आली. दोन वर्षे बससेवा बंद होती. त्यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हा संप सहा महिने चालल्यामुळे सिटी बस बंद ठेवावी लागली तरीदेखील स्मार्ट बसमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे समोर येत आहे.

सध्या स्मार्ट सिटीकडून ५८ सिटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेस २० मार्गांवर धावत आहेत. बसेस वाढवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुमारे ४० बस दुरुस्तीअभावी सुरू करता येत नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बसेसच्या दुरुस्तीसाठी सिटी बस व्यवस्थापनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येक कामासाठी संचिकेला मान्यता घेण्यात वेळ जात आहे. सिटी बसचे चालक आणि वाहक यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत असले तरी इतर खासगी एजन्सीकडून मिळणारे वेतन आणि स्मार्ट सिटी बसचे वेतन यामध्ये बरीच तफावत आहे. चालक-वाहकांना प्रोत्साहन देण्याची कोणतीही योजना राबवली जात नाही. बसेसचे मेंटेनन्स योग्य रीतीने होत नाही. कामचलावू धोरण राबवण्यात येत असल्यामुळे इंजिन दुरुस्तीसाठी एसटी महामंडळाच्या कार्यशाळेवर अवलंबून राहावे लागते. बहुतांश सिटी बसच्या इंजिनमधील दुरुस्ती, ब्रेक, वायरिंग, टायर बदलणे याकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने बसेस चालवणे धोकादायक बनले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रवाशांना सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी येत असल्यामुळे मार्गावर वेळेवर बसेस धावत नाहीत. स्मार्ट बस असली तरी मानसिकता मात्र एसटीची असल्याचे दिसून येते.

आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट होईना दोन महिन्यांपूर्वी चालत्या स्मार्ट बसला आग लागली होती. त्याचे कारणदेखील योग्य मेंटेनन्स होत नाही हेच असावे अशी चर्चा आहे. इंजिन जास्त गरम होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी समोर आल्या. एकदा गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ती पूर्ण दुरुस्त होत नाही तर तात्पुरती दुरुस्त होते. त्यामुळे पुन्हा काही दिवसांतच या बसला पुन्हा वर्कशॉपमध्ये लावावे लागते. विशेष म्हणजे स्मार्ट बसमध्येसुद्धा दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. मात्र त्यांना पुरेशी मशिनरी नाही, रोज बस चेक करण्यासाठी रँपदेखील नाही. त्यासाठीसुद्धा एसटीवर अवलंबून राहावे लागते. रात्री दोन ते सकाळी सहापर्यंत एसटी वर्कशॉपमधील रँप मोकळा असतो. तेव्हा या तपासण्या कराव्या लागतात.

बातम्या आणखी आहेत...