आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२१ एप्रिल रोजी रात्री एक वाजता पोटूळ रेल्वेस्थानकावर सिग्नलचे वायर कापून देवगिरी एक्स्प्रेसवर सात ते आठ जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकल्याची घटना घडली होती. एकाच महिन्यात तिसरा दरोडा पडल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तपास करत दरोडेखोरांचा म्होरक्या शिवानंद ठकसेन काळे ( ४०) याला अटक केली. शिवानंद महाराष्ट्र, गुजरात पोलिसांच्या रेकाॅर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून गुजरातमध्ये पोलिसाचा खून केल्याने तो सुमारे आठ वर्षे तेथील कारागृहात होता. २० एप्रिल रोजी वाळूजमध्ये कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्याचे चार जिल्ह्यांतील नातेवाईक, मित्र एकत्र आले. तेथे त्यांनी पोटूळला दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
२१ एप्रिल रोजी मध्यरात्री निजामाबाद- मुंबई देवगिरी एक्स्प्रेसवर पोटूळ येथे दगडफेक करून लूटमार करण्यात आली. प्रवाशांना वेळीच दरोड्याचा अंदाज आला व अनेकांनी खिडक्या, दरवाजे लावून घेतले. एस-४ बोगीतील लक्ष्मी प्रभाकर (४५, रा. मुंबई) यांनी नेमके काय घडते हे पाहून खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. तेवढ्यात दरोडेखोराने उडी मारत त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम पोत हिसका देऊन तोडली. अनेकांचे मोबाइल पळवले. पण लक्ष्मी वगळता कोणी तक्रार दिली नाही.
खबऱ्याने माहिती दिल्यामुळे पकडणे शक्य : २ एप्रिल रोजीही पोटूळलाच दरोडा पडला होता. त्यामुळे लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंभीर दखल घेत वेगाने तपासाचे आदेश दिले. दरोडेखोर अत्यंत सराईत व कुख्यात असल्याने पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. मात्र, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव यांना एक गुन्हेगार वाळूज परिसरात चोरीची साखळी विकण्याच्या प्रयत्नात असल्याचे खबऱ्याने सांगितले. दरोड्याच्या काही तासांनंतर ताे आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अंधुक कैद झाला होता. तो शिवानंदच असेल, याची खात्री झाल्यावर गंभीरराव यांनी शोध सुरू केला. २६ एप्रिल रोजी शिवानंदच्या टोळीचे साथीदार एन-७ मध्ये चोरीचे सोने विकण्यासाठी येऊन गेल्याचे कळाल्याने तो शहरात फिरत असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाले. १ मे रोजी शिवानंद त्याच्या वसाहतीतून निघून दुसऱ्या जिल्ह्यात पळून जाणार असल्याचे कळताच पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेत वाळूज गायरान वस्तीकडे रस्त्याच्या कडेला सापळा रचण्यात आला.दुचाकीवरून तो जात असताना पोलिसांनी त्याला झटापटीनंतर ताब्यात घेतले. या कामगिरीत गंभीरराव यांच्यासह निरीक्षक सुरेश भाले, साहेबराव कांबळे, अमोल देशमुख, सहायक फौजदार शंकर राठोड, प्रमोद जाधव, प्रशांत मंडळकर, सूरज गभणे, राहुल गायकवाड, सोनाली मुंढे यांचा सहभाग होता.
खून, दरोडे, कट्ट्यांची विक्री, चार जिल्हे, दोन राज्यांत शोध
२०१८ मध्ये गुजरातमध्ये पोलिसाचा खून केल्याच्या गुन्ह्यात शिवानंदची आठ वर्षांनंतर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर तो गुन्हे करत होता. त्याच्यावर चार-पाच जिल्हे, दोन राज्यांमध्ये दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गावठी कट्टे विकण्याचे सुमारे २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत. या चार-पाच जिल्ह्यांचे पोलिस त्याच्या शोधात होते. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी महिनाभरापूर्वीच गावठी कट्टा प्रकरणात त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता.
२५ हून अधिक गुन्हे, चार जिल्ह्यांतील आरोपींचा सहभाग
शिवानंदने पोटूळला लूटमार केल्याची कबुली दिली. औरंगाबादेत सोन्याची पोत कोणी घेईना. म्हणून नेवासा तालुक्यातील वरखेड येथे एक लाख रुपयांना विकल्याचे सांगितले. मग पोलिसांनी सराफाला नोटीस देत आरोपी करण्याची प्रक्रिया करून साखळी हस्तगत केली. या कारवाईबद्दल अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी १० हजार रुपये बक्षीस दिल्याचे लोहमार्गच्या जनसंपर्क अधिकारी सहायक निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.