आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे रविवारी (१ मे) सभेत मशिदींवरील भोंग्यांविषयी बोलत असताना त्यांच्या कानावर एक आवाज आला. तो अजानचा असावा, असे वाटून त्यांनी पोलिसांना ‘हा आवाज करणाऱ्याच्या तोंडात बोळा कोंबा’ असे म्हटले. याविषयी दिव्य मराठी प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता तो आवाज अजानचा नव्हे तर अंत्यविधीसाठी येण्याचे आवाहन करणारा पुकारा होता. मैदानापासून जवळपासच्या मशिदीतून हा आवाज नसावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
रविवारी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास राज यांनी त्या आवाजावर हल्लाबोल केला. मात्र, ती अजानची वेळ नव्हती, असे काही जणांचे म्हणणे होते. तर काही जण कोणताच आवाज आला नाही, राज यांना भास झाला असावा, असेही म्हणत होते. त्यामुळे दिव्य मराठीने बंदोबस्तावर तैनात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले की, मशिदीतून आवाज येत होता, ही वस्तुस्थिती आहे.
मात्र, तो नमाजच्या अजानचा नव्हता. कुणाच्या तरी अंत्यविधीसाठी कब्रस्तानात यावे, असा पुकारा करणारा होता. तो २० ते २५ सेकंदांत थांबल्याने पोलिसांना तिकडे जाणे शक्यही नव्हते. शिवाय ही मशीद मैदानापासून बऱ्याच दूर अंतरावरील असावी. दिव्य मराठी प्रतिनिधीने आसपासच्या मशिदींच्या मौलानांशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, ८.१० वाजताच आमच्याकडील अजान झाली. ८.४० च्या सुमारास अंत्यविधीसाठी कोणताही पुकारा झाला नाही. तो दूरच्या मशिदीतील आवाज असावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.