आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे रविवारी (१ मे) सभेत मशिदींवरील भोंग्यांविषयी बोलत असताना त्यांच्या कानावर एक आवाज आला. तो अजानचा असावा, असे वाटून त्यांनी पोलिसांना ‘हा आवाज करणाऱ्याच्या तोंडात बोळा कोंबा’ असे म्हटले. याविषयी दिव्य मराठी प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता तो आवाज अजानचा नव्हे तर अंत्यविधीसाठी येण्याचे आवाहन करणारा पुकारा होता. मैदानापासून जवळपासच्या मशिदीतून हा आवाज नसावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
रविवारी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास राज यांनी त्या आवाजावर हल्लाबोल केला. मात्र, ती अजानची वेळ नव्हती, असे काही जणांचे म्हणणे होते. तर काही जण कोणताच आवाज आला नाही, राज यांना भास झाला असावा, असेही म्हणत होते. त्यामुळे दिव्य मराठीने बंदोबस्तावर तैनात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले की, मशिदीतून आवाज येत होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, तो नमाजच्या अजानचा नव्हता. कुणाच्या तरी अंत्यविधीसाठी कब्रस्तानात यावे, असा पुकारा करणारा होता. तो २० ते २५ सेकंदांत थांबल्याने पोलिसांना तिकडे जाणे शक्यही नव्हते. शिवाय ही मशीद मैदानापासून बऱ्याच दूर अंतरावरील असावी. दिव्य मराठी प्रतिनिधीने आसपासच्या मशिदींच्या मौलानांशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, ८.१० वाजताच आमच्याकडील अजान झाली. ८.४० च्या सुमारास अंत्यविधीसाठी कोणताही पुकारा झाला नाही. तो दूरच्या मशिदीतील आवाज असावा.
परवानगी पत्रातील १५ पैकी चार अटी मोडल्याचा प्राथमिक अंदाज, मुंबईतील वरिष्ठांच्या आदेशानंतरच गुन्हा दाखल होणार
पोलिस कारवाईआधीच वकिलांची यादी मनसे कार्यकर्त्यांच्या हातात
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या रविवारच्या सभेत नियम मोडणाऱ्या तसेच मशिदीसमोर भोंगे लावण्याची शक्यता असणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी पोलिसांनी तयार करण्याआधीच पक्षाच्या वकिलांची यादी कार्यकर्त्यांच्या हातात पोहोचली आहे. कार्यकर्त्यांनी राज यांच्या आदेशाचे पालन करावे. गुन्हे दाखल झाल्यास मनसेचे वकील विनामूल्य खटले लढतील, असा निरोपच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. जनहित कक्ष व विधी विभागात राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले २००० हून अधिक वकील सदस्य आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कार्यकारिणी असून औरंगाबाद-जालन्यासाठी १० वकिलांचे पॅनल आहे. याव्यतिरिक्त राज ठाकरे यांना मानणाऱ्या अनेक वकिलांचे सहकार्य लाभते. या वकिलांची यादी मोबाइल नंबरसहित कार्यकर्त्यांमध्ये वितरित करण्यात आली आहे. कुठल्याही महाराष्ट्र सैनिकाला समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन यादीद्वारे विभागाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विनोद भाले यांनी केले आहे.
...आता न्यायवाडा : पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना विधी सल्ला व सेवा देण्यासाठी मनसेने मुंबई, नाशिक व पुण्यात न्यायवाडा उपक्रम सुरू केला आहे. पक्षाच्या कार्यालयात दररोज निश्चित वेळेत वकील उपस्थित असतात. विनामूल्य सहकार्य करतात. औरंगाबादमध्ये लवकरच ही सेवा सुरू होईल. कार्यकर्त्यांसाठी विनामूल्य लढण्यास आम्ही तयार आहोत, असे अॅड. भाले यांनी सांगितले.
निवासी क्षेत्र असल्याने ५० डेसिबल आवाजाची मर्यादा होती, मात्र राज ठाकरेंकडून उल्लंघन राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी आयोजकांना १५ अटी घातल्या होत्या. त्यातील चार अटी मोडल्याचे प्रत्यक्ष दिसत असतानाही सोमवारी (२ मे) या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सभेचा अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर काय तो निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही. आसन व्यवस्था १५ हजार एवढी असल्याने त्यापेक्षा अधिक लोकांना बोलवू नये. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, धर्म, जन्मस्थान इ. किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अथवा चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही आणि आवाजाची ५० डेसिबलची (मैदानाजवळ शाळा असल्याने शांतता क्षेत्र) मर्यादा पाळावी या प्रमुख चार अटींसह एकूण १५ अटी घालून दिल्या होत्या. मात्र वरील तीन अटींसह आवाजाची मर्यादादेखील पाळण्यात आली नाही. सभेचे ठिकाण निवासी व शांतता क्षेत्रात होते. तेथील आवाजाची मर्यादा ५० डेसिबल एवढी असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ११३ ते १२० डेसिबल आवाज होता. भाषण होऊन २४ तास उलटले तरी राज ठाकरे, आयोजक, संयोजक यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
अहवाल गृह खात्याला पाठवणार..
आम्ही सभेचा अहवाल बनवत आहोत. शहरातील काही तज्ज्ञांशी आम्ही यासंदर्भात बोलत आहोत. अहवाल तयार झाल्यानंतर तो गृह खात्याला पाठवला जाणार आहे. - बालाजी सोनटक्के, सहायक पोलिस आयुक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेला रविवारी अशी गर्दी झाली होती. संपूर्ण मैदान गर्दीने भरून गेले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.