आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा अभियान:हिंगोली जिल्हा राज्यात प्रथम, ऑनलाईन पारितोषिकाचे वितरण, पालिकेकडून फटाके फोडून जल्लोष

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अभियानात पृथ्वी, जल, वायू हे घटक ठेवले होते.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी झालेल्या 222 नगर पालिकांमधून हिंगोली जिल्हयाने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे हिंगोलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. राज्य शासनाने मागील वर्षापासून माझी वसुंधरा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात पृथ्वी, जल, वायू हे घटक ठेवले होते. त्यानुसार राज्यातील नगर पालिकांनी या घटकावर काम करून शहराचा चेहरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अभियानात पुरस्कार देखील देण्याची घोषणा करण्यात आली होती.

हिंगोली पालिकेने या अभियानात सहभाग नोंदविला होता. नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अभियंता रत्नाकर आडशिरे, अभियंता सनोबर तसनीम, शाम माळवटकर, बाळू बांगर, पंडीत मस्के, विनय साहू यांच्यासह कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने विविध उपक्रम राबविले. हिंगोली पालिकेने पृथ्वी या घटकामध्ये शहरात मागील वर्षी 5 हजार झाडे लाऊन त्याचे संगोपन केले तर 15 हजार देशीवृक्षांची नर्सरी तयार करून या रोपांची लागवड केली आहे.

शहरातील घाण पाणी थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने पाणी दुषीत होत होते. यासाठी कयाधू नदीजवळ शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुध्द करूनच नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पाणी प्रदुषण कमी झाले आहे. या शिवाय शहरातून गोळा केला जाणाऱ्या घनकचऱ्याची डंम्पिग ग्राऊंड येथे गोळा केला जात आहे. दररोज घनकचरा गोळा केला जात असल्याने शहरात कचऱ्याचे ढिग दिसत नाही. त्यामुळे हवा प्रदुषणाचे प्रमाणही कमी झाले आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 222 नगर पालिकांच्या गटातून हिंगोलीला पहिला पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्काराची घोषणा होताच पालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व हिंगोलीकरांनी जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...