आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीचे पुनरुज्जीवन:‘नमामि गंगे’त औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश, नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न होणार

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या नमामि गंगे योजनेतील दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश करण्यात आला आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून नदीचे पुनरुज्जीवन करणे आणि नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, असे या योजनेत अपेक्षित आहे. काही शतकांपूर्वी खाम नदी औरंगाबाद शहरातून खळाळून वाहत होती. अगदी स्वातंत्र्यानंतर काही वर्षे स्वच्छ पाण्याचा प्रवाह होता. मात्र, १९७० नंतर हर्सूल तलावापासून पुढे नागरी वसाहती वाढल्या. अनेकांनी नदीपात्रात घरे बांधली. ड्रेनेज वाहिन्या सोडल्या. कचरा टाकणेही सुरू झाले. त्यामुळे पाणी दूषित होत गेले. २००४-२००५ मध्ये सामाजिक चळवळीतील नेते प्रा. विजय दिवाण आणि अन्य काही मंडळींनी पात्र स्वच्छता मोहीम राबवली.

खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून छावणीतील लोखंडी पुलाजवळ प्रकल्प राबवला. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर गेल्या वर्षी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी नदी पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेतली. लोकसहभाग व महापालिकेतर्फे सौंदर्यीकरणाची कामे केली. त्याची माहिती त्यांनी नमामि गंगे योजनेचे महासंचालक राजीव रंजन मिश्र यांना दिल्यावर ते प्रभावित झाले. त्यांनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खाम नदीचा समावेश केला. आता प्रकल्प अहवाल सादर करून मंजुरी मिळाल्यावर केंद्राकडून महापालिकेला ठोस निधी दिला जाईल. तो नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्याकरिता वापरला जाणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...