आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस खात्यात सर्वप्रथम कारवाई करतो त्याचा मान मोठा. बड्या अधिकाऱ्यांची शाबासकी मिळवण्यासाठी ही स्पर्धा नेहमीच पाहायला मिळते. बंदोबस्त आणि इतर कामांच्या धबडग्यात पोलिस ठाणे कायम या स्पर्धेत काहीसे मागे राहते. मात्र, केवळ तपासाची जबाबदारी असलेली गुन्हे शाखा त्यात बाजी मारते. गुन्हे शाखेवर मात करण्यासाठी क्रांती चौक पोलिसांनीही प्रयत्न केले. मात्र, काही मिनिटांनी डाव हुकला अन् गुन्हे शाखेची सरशी झाली.
त्याचे असे झाले की, गांधीनगरमध्ये राहणारे नरेश अनुपसिंग रिडलॉन (५५) यांच्या घरी ९ डिसेंबरला लग्न होते. त्यानिमित्त सर्व नातेवाईक त्यांच्या घरी एकत्र जमले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व जण झोपण्यासाठी गेले. मात्र, रात्रीतून घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीतील लाकडी कपाटातून ४ लाख ३० हजार रुपये व अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सकाळी समोर आले. क्रांती चौक पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक विकास खटके यांच्याकडे तपास दिला. रिडलॉन यांनी नाशिकचा नातेवाईक अक्षय उर्फ राजू बिगानिया याच्यावर संशय व्यक्त केला.
त्यामुळे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके रविवारी सकाळीच नाशिककडे पथकासह रवाना झाले. दुसरीकडे गुन्हे शाखेला ही कुणकूण लागल्याने सहायक निरीक्षक मनोज शिंदे हेही पथकासह नाशिककडे रवाना झाले. दोन्ही पथकांना एकमेकांविषयी कल्पना नव्हती. दुपारी दोन्ही पथके नाशकात धडकली. क्रांती चौक पोलिसांआधीच गुन्हे शाखेने अक्षयला गाठले व तत्काळ ताब्यात घेत औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला. क्रांती चौक पोलिसांना हे कळाले आणि त्यांना रिकाम्या हाताने परतीचा प्रवास करावा लागला. गुन्हा घडल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखा व पोलिस ठाण्यांमध्ये नेहमीच स्पर्धा असते.मात्र, एकाच दिवशी एकाच वेळी एकाच शहर पोलिस विभागातील दोन पथके दुसऱ्या शहरात धडकल्याने विभागाअंतर्गत असलेल्या मजेशीर स्पर्धेची रविवारी खमंग चर्चा पोलिस विभागात सुरू होती.
गुन्हे शाखेला मिळते स्वतंत्र वाहन आणि थेट परवानगी पोलिस ठाण्यांवर अनेक जबाबदाऱ्या असल्याने दुसऱ्या शहरात जाण्यासाठी वाहनांच्या नियोजनापासून सर्व ठरवावे लागते. उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागते. गुन्हे शाखेसाठी मात्र यात काहीसे सोपे असते. स्वतंत्र वाहन व थेट आयुक्तालयातून परवानगी भेटत असल्याने त्यांना तत्काळ रवाना होणे सोपे जाते, असे मत ठाण्यात कार्यरत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.