आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन अभ्यासासाठी पुरेशी साधने नसल्याने प्रकल्पाधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी ‘अनलॉक लर्निंग’अंतर्गत शाळा आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे पथक स्थापन करून त्यांना प्रत्येक गाव दत्तक देण्यात आले आहे. या गावात भेट देऊन शिक्षक ज्ञानदान करू लागले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात बोथी, गोटेवाडी, पिंपळदरी, शिरडशहापूर, जामगव्हाण या ठिकाणी शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. या शाळांमधून सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळाही बंद आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी गावीच आहेत. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक शाळांकडून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्या गटानुसार शिक्षण दिले जात आहे. मात्र अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्राॅइड मोबाईल नाहीत. कुठे वीज पुरवठ्याचा प्रश्न तर कुठे मोबाइलची रेंज नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे होती. मात्र त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रकल्पाधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी अनलॉक लर्निंग अंतर्गत शाळा आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला. त्यांनी या शाळांमधील ८० शिक्षक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, गृहपाल यांचे पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून पाच शाळांअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सुमारे १२५ गावांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रत्येक शिक्षकांना गावे वाटून दिली आहेत. त्या शिक्षकांनी किमान दोन दिवस आड करून त्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या गावांमधून सामाजिक अंतर पाळून शाळा भरू लागली आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवणे तसेच त्यांना दोन दिवसांचा गृहपाठ देण्याचे काम केले जाऊ लागले आहे. दोन दिवसानंतर गावात पोहोचलेले शिक्षक सुरवातीला विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी करू लागले अन् त्यानंतर त्यांच्या अडचणी सोडवत त्यांना शिक्षण देऊ लागले आहेत. त्यामुळे गावात शाळा भरू लागल्या आहेत. त्यामुळे दोन हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, पाच विद्यार्थी असलेल्या गावातही शिक्षक नियमितपणे जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ लागले आहेत. प्रकल्पाधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकाश देणारा ठरू लागल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न
आदिवासी आश्रमाशाळांतील विद्यार्थी कोरोनामुळे घरीच आहे. दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षणाचा प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये प्रत्येक शिक्षक त्यांना दिलेल्या गावात जाऊन शिक्षण देऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत राहावेत, यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. -डॉ. विशाल राठोड, प्रकल्पाधिकारी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.