आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकी एकादशी:पंढरपुरात 20 हजार भाविकांची हजेरी, दोन क्विंटल खिचडीचा वाटला प्रसाद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी एकादशीनिमित्त छोटा पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २० हजार भाविकांनी हजेरी लावली. दिवसभरात २ क्विंटल साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या ९५ टक्क्यांनी वाढली, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आषाढी एकादशीप्रमाणेच या एकादशीला विशेष महत्त्व असल्याने शुुक्रवारी (४ नोव्हेंबरला) उत्सवाला भाविकांनी हजेरी लावली. काकडा आरती, अभिषेक, आरती प्रत्येक विधीला भाविकांची उपस्थिती होती. पहाटे नीलेश सोनवणे, मीरा सोनवणे यांच्या हस्ते अभिषेक झाला.विठ्ठलनामाचे स्मरण करत भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांब रांगा लावल्या. एकादशीनिमित्त सुरक्षिततेसाठी ३ पोलिस निरीक्षक, २० पोलिस कर्मचाऱ्यासह वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्याचे मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले.

हरिनामाचा गजर : मंदिराच्या प्रांगणातच अखंड हरिनामाचा सप्ताह सुरू होता. सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, १ ते ५ श्यामकांत महाराज यांची भागवत कथा, तर रात्री ८ ते १० युवराज महाराज देशमुख यांचे हरिकीर्तन, विष्णू महाराज बांडे यांचे कीर्तन सुरू होते.

गजानन मंदिरात अभिषेक, ज्योतीनगरात अारती, कांचनवाडीत पूजा १ शहरातील गजानन महाराज मंदिरात सकाळी मंदिराचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते, विश्वस्त डॉ. उद्धव शिंदे यांच्या उपस्थितीत ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करण्यात आले. यानंतर दुपारी आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप झाले, संध्याकाळी भागवत पाटील यांच्या हरिकीर्तनात भाविक तल्लीन झाले. २ ज्योतीनगरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत अभिषेक, आरती करण्यात आली. या वेळी माजी नगरसेविका सुमित्रा हळनोर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संध्याकाळी ७ वाजता संध्या देशमुख यांची भजनसंध्या रंगली. ३ कांचनवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता महापूजा आणि आरती झाली. या वेळी जनार्दन कांबळे, विमल कांबळे, गणेश दरक, सुभाष पवार, पांचाळ महाराज यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...