आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने अज्ञात पालकांनी रस्त्यावर सोडून पोबारा केला. शहानूरमियाँ दर्गा चौकात चिमुकली एकटीच सायंकाळपर्यंत केविलवाणी रडत आई-वडिलांची वाट पाहत होती. स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेत पालकांविरोधात गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपूर्वीच याच भागातील अनाथाश्रमात अज्ञात पालक नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सोडून गेले होते. २८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून शहानूरमियाँ दर्गा परिसरात एक चिमुकली गांगरलेल्या अवस्थेत इकडे-तिकडे भटकत होती. काही वेळ स्थानिकांना तिचे पालक आसपासच असतील असे वाटले. मात्र, आपण पालक परत येत नसल्याचे पाहून चिमुकली रडायला लागली. स्थानिकांनी तिची विचारपूस केली. मात्र, काहीच सांगता येत नव्हते. सहायक फौजदार शेख युसूफ शेख अब्दुल्ला (५६) यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत मुलीला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शोध सुरू, सध्या बालगृहात : मुलीचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असल्याचे निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले. हिंदीतून बोलल्यास ती काहीसा प्रतिसाद देते. पालकांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने तिची रवानगी बालगृहात करून पालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. चिमुकली बालगृहात थोडी स्थिरावली असून पाेलिसही तिची विचारपूस करत आहेत. सात दिवस उलटूनही कुणीही न आल्याने तिला जाणीवपूर्वक सोडल्याचे बागवडे यांनी सांगितले. पाेलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शोध घेत आहेत. ही मुलगी कुणाच्या आेळखीची असल्यास उस्मानपुरा पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.