आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंददायी शिक्षणासाठी शिक्षिकेचा पुढाकार:टाकळी शिंपीच्या निसर्गशाळेत मुले झाेके खेळत पाठ करतात पाढे

औरंगाबाद / विद्या गावंडे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांना शिक्षणाची गाेडी लागावी, त्यांच्या मनातून शाळेची भीती दूर व्हावी म्हणून टाकळी शिंपी येथील जिल्हा परिषद शिक्षक निसर्गशाळा भरवत आहेत. या शाळेत मुले झोके खेळत पाढे म्हणतात, गणितेही सोडवतात. शिक्षकांच्या या उपक्रमशीलेतेमुळे ते सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. औरंगाबादपासून १२ ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी शिंपी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून दाेन शिक्षक आहेत. या गावाची लाेकसंख्या सहाशे आहे. २०१८ पर्यंत आठ-दहा विद्यार्थी असल्याने ही शाळा बंद पडणार होती. परंतु २०१९ मध्ये येथे बदली होऊन आलेल्या शिक्षिका जयश्री बनकर यांनी शाळा बंद हाेऊ देणार नाही, असा निश्चय केला. येथे चार भिंतीच्या आत विद्यार्थी शिकत नाहीत. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांच्या सावलीत वर्ग भरतो. झाडांना झोका बांधलेला आहे. तेथे मुलांना खेळ, पाठ्यपुस्तकातील धडे, कविता शिकवतात. गोष्ट स्वरूपात कृतीच्या माध्यमातून शिकवले जाते. शनिवारी मुले ऑडिओ, व्हिडिओसह त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर डान्स करतात. यामुळे त्यांना शाळेचा कंटाळा येत नाही.

विद्यार्थ्यांची संख्या वाढली
आनंददायी शिक्षणामुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या आता ४० ते ५० वर पाेहाेचली आहे. मुलांना समजून घेत कृतीच्या माध्यमातून शिकवले पाहिजे. मुले वर्गात कशी रमतील, त्यासाठी काय करता येईल याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे जयश्री बनकर म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...