आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपाचा तिढा:संपाच्या 118 दिवसांत एसटी महामंडळाला तब्बल 1600.25 कोटी रुपयांचा फटका

उस्मानाबाद / हरेंद्र केंदाळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा सोमवारी ११८ वा दिवस उजाडला. आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नाही. या काळात महामंडळाला १६०० कोटी २५ लाख रुपयांचा फटका बसला. दरम्यान, कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांद्वारे बससेवा सुुरू करण्यात आली. यातून रविवारपर्यंत चार कोटी ९३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पूर्वी हा आकडा ४० ते ४५ कोटी रुपये होता, असे सूत्रांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटीची चाके थांबली. राज्यात विविध प्रादेशिक विभागांत वेगवेगळ्या तारखांना आंदोलन सुरू करण्यात आले. महामंडळाच्या नोंदीनुसार २७ ऑक्टोबर २०२१ पासून आंदोलन सुुरू करण्यात आले, तर कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी आंदोलन सुरू केले. दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सात डिसेंबरपासून आंदोलनास प्रारंभ झाला होता. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांची अडचण झाली. ही परवड लक्षात घेऊन ३ नोव्हेंबरपासून राज्यातील विविध आगारांतून तुरळक मार्गावर बससेवा सुरू केली होती. तेव्हा बसची तोडफोड करण्याचे प्रकार घडले होते. मात्र, त्यानंतर ७ नोव्हेंबरपासून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. मंगळवारी संपाच्या मुद्द्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यात सुरू असलेल्या अंशत: वाहतुकीमुळे जेथे ६० ते ६५ लाख प्रवासी नियमित प्रवास करत होते, तेथे रविवारी केवळ सहा लाख ८८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.

उद्याच्या तारखेकडे लक्ष
शंभरपेक्षा जास्त दिवसांपासून आम्ही आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आता न्यायालयाकडून न्याय मिळण्याची आशा आहे. शासन आणि कर्मचाऱ्यांनाही संप मिटावा असेच वाटते. दरम्यानच्या काळात कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराची फार तारांबळ झाली. शासनाने आता लक्ष द्यावे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळतो. आम्हालाच नाही. आमची मागणी कुठे चुकीची आहे? -रवी आढाऊ, माजी सदस्य, संयुक्त कृती समिती.

बातम्या आणखी आहेत...